जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि
अभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक!
जात्याच हुषार असलेले, सुसंस्कृततेचे व बुद्धिमत्तेचे लेणे घेऊन जन्माला आलेले जयंत नारळीकर हे रँग्लर विष्णू नारळीकर (गणित-तज्ज्ञ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमतीबाई ह्यांचे चिंरंजीव होत. त्यांचा जन्म १९३८ मध्ये कोल्हापुरात झाला.
जयंतरावांची बुद्धी नव्या वाटा चोखाळणारी असल्याने त्यांनी दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविला होता. त्यांना संस्कृतमध्येदेखील रस होता. १९व्या वर्षीच ते बी.एस्सी. पदवी प्राप्त करून केंब्रिजला गेले व रँग्लर झाले. (केंब्रिज विद्यापीठात गणित विषयात विशेष यश प्राप्त केल्यानंतर रँग्लर ही पदवी मिळते.) १९६० साली पीएच.डी. चे उच्च शिक्षण त्यांनी डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ह्या गुरू-शिष्य जोडीने विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिद्धांत सिद्ध केला. विश्व स्थिर असले, तरी ते आकुंचन-प्रसरण पावते. पण एकूणच ते विकसनशील आहे , प्रसरण पावत आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला. भारत सरकारने या संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. डॉ. नारळीकर यांच्या गुरूत्वाकर्षाणाबद्दलच्या संशोधनालाही जगमान्यता मिळाली.
१९७२ मध्ये भारतात परतून ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संशोधन, अध्यापन यांबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे या गोष्टीही ते महत्त्वाच्या मानतात. अनेक लेख,कथा-कादंबर्या लिहून; व्याख्याने, चर्चासत्रे, ब्रह्मनादसारखी दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान लोकप्रिय केले. विज्ञानातील सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत.
खगोलशास्त्र, खगोल - भौतिकशास्त्र, गणित व विश्र्वाची उत्पत्ती हे त्यांचे अभ्यासाचे व संशोधनाचे प्रमुख विषय होत. १९८८ मध्ये खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. मुलांविषयी डॉ. नारळीकरांना विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत.
अवघ्या २७व्या वर्षी राष्ट्रपतींकडून पद्मभूषण, २००४ मध्ये पद्मविभूषण, संशोधन कार्याबद्दल भटनागर पुरस्कार, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, फाय फाउंडेशन, बिर्ला पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार-असे सुमारे ६५ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध संस्थांची मानद फेलोशिप त्यांना मिळाली आहे. अनेक पुरस्कार, सन्मान मिळूनदेखील नम्र, सौजन्यशील असलेले, उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेले, स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जयंत नारळीकर होत.