डॉ. वसंत गोवारीकर

प्रामुख्याने अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रांतील संशोधनात्मक अभ्यासात, अमूल्य योगदान देणारे

भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ!

 

‘भारत संपूर्ण साक्षर होण्याची गरज आहे व सर्वांना पुरून उरेल एवढी उर्जा निर्माण करायला हवी,’ असे प्रतिपादन करणार्‍या डॉ. वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म पुण्यात झाला. वसंत गोवारीकर यांना आपण संशोधक-शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. पण त्यांच्या या प्रतिपादनावरून - ते केवळ बंद खोलीत बसून संशोधन करणारे शास्त्रज्ञ नव्हते, तर ते भारतातील मूलभूत समस्यांची जाण असणारे व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ होते - हे लक्षात येते.

वयाच्या ११व्या वर्षीच यांत्रिक खटपटी करण्याच्या त्यांच्या वृत्तीतून त्यांनी चरख्याच्या पेळूतून धागा निघताच आपोआप गुंडाळला जाण्याची नवी पद्धत शोधली होती, व महात्मा गांधीजींचे चिटणीस महादेवभाई देसाईंची शाबासकी मिळवली होती. ‘मुलांचे पाय, पाळण्यात दिसतात’ ही म्हण त्यांनी सिद्ध केली.

वसंतरावांचे शालेय व बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. काही नोकर्‍या करून बाह्य शिक्षण पद्धतीने त्यांनी एम.एस्सी. पूर्ण केले. एम. एस्सी.नंतर इंग्लंड येथे त्यांनी प्रा. गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाही पदार्थावरील पी.एचडी. अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केली. त्या वेळी अनेक पाठ्यपुस्तकांत गार्नर-गोवारीकर थिअरीचा समावेश झाला. वयाच्या २८व्या वर्षी केंब्रिज, ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे अमेरिकेत समरफिल्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलवून घेण्यात आले.

१९६५ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये वसंतराव व विक्रम साराभाई उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले.  त्याचे फलित म्हणजे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आज ते अव्वल समजले जातात. ते नंतर त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे १७ एप्रिल, १९८३ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली एस.एल.व्ही.-३ हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला व स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपटली.

काही काळ  ते विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. १९९१ ते १९९३ या दरम्यान ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते.त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञांना उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशेधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरविणे व त्याचा प्रसार करणे ही कामे प्रामुख्याने झाली. पुढे काही वर्षे ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, तसेच खतांच्या विश्र्वकोश प्रकल्पाचे कामही त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे . १९९४-२००० या दरम्यान गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले.

अनेक पुस्तके व शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत. ‘आय प्रेडिक्ट’ हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. पद्मश्री, फाय फाउंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक ,अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स असे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्याच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel