श्री.वालचंद हिराचंद दोशी

सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील

नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट!

श्री. वालचंद शेठ हे एक वेगळ्या  प्रकारचे उद्योगपती होते. उद्यामशीलता, उत्साह आणि आत्मविश्वास याचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. वेगळा विचार करणे, त्या विचाराचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी जलदरीत्या करणे आणि स्वत:च्या बलस्थानांवरची श्रद्धा या गुणांवर त्यांनी औद्योगिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. भारत हा एक दिवस जगाचा पुढारी होऊ शकेल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी त्यांचे सारे आयुष्य निरनिराळ्या उद्योगधंद्यामार्फत भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी वेचले. भारतातील माणसांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. याच आधारावर पूर्ण जगाला आदर्शवत ठरतील अशी कामे त्यांनी औद्योगिक क्षेत्रात केली. भारताची मान पूर्ण जगात उंचावण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. ‘व्यवस्थापनातील उत्तम संकल्पना प्रत्यक्षात उतरवून चोख कामे पार पाडणे’, हा वालचंद शेठजींचा लौकिक होता.

व्यापार्‍यांच्या घराण्यात हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. घरातील व्यवसाय हा मुख्यत्वे सावकारी आणि व्यापाराचा होता. वालचंद शेठजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. वालचंद शेठजींना घरच्या व्यापार व सावकारीच्या व्यवसायामध्ये अजिबात रस नव्हता. स्वत:च्या जोखीम पत्करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार व पुढे उद्योगपती होण्याचा निर्णय घेतला. बलवंत फाटक या रेल्वेतील कुशल कारकुनाबरोबर त्यांनी भागीदारीत रेल्वेमार्ग बांधणीच्या कंत्राटी व्यवसायाची सुरुवात केली. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील बोगदेही वालचंदजींच्याच कामाची उदाहरणे आहेत.

पुढे अतिशय आकस्मिकरीत्याच वालचंद शेठजी सागरी वाहतूक व्यवसायात शिरले. त्यांना सुरुवातीच्या काळात प्रस्थापित ब्रिटिश कंपन्यांकडून कडवा विरोध झाला. त्यांनी सागरी वाहतुकीमधील ब्रिटिशांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे अनेक डोंगर सरकारच्या मार्फत ब्रिटिश कंपन्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना खूप तोटा व त्रास सहन करावा लागला. सागरी वाहतुकीच्या व्यवसायात शिरण्यामागे सुरुवातीस जरी व्यापारी दृष्टीकोन होता, तरीदेखील नंतर त्याला जणू राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप आले. त्यांनी स्वत:च्या कंपनीचा तोटा पत्करून भारतातील इतर सागरीवाहतूक कंपन्यांना उभे राहण्यासाठी मदत केली आणि हळूहळू ब्रिटिशांची या व्यवसायातील मक्तेदारी मोडून काढली. या त्यांच्या कार्यामुळे १९५३ पर्यंत भारतीय किनार्‍यालगतच्या वाहतुकीचा जवळ जवळ २१% हिस्सा ब्रिटिशांकडून हिरावण्यात त्यांना यश आलं. वालचंदशेठ व त्यांची ‘सिंधिया स्टीम नॅव्हीगेशन’ ही कंपनी म्हणूनच भारतीय सागरवाहतुकीच्या क्षेत्रात कायमचं, मानाचं स्थान मिळवून आहे.

असे म्हटले जाते की, वालचंद शेठजी त्यांच्या उद्योगाची सुरुवात काहीशा बेफिकिरीने आणि उतावीळपणे करत असत. पण हेच त्यांचे शक्तिस्थानही होते. बांधकाम आणि सागरी वाहतूक व्यवसायात ते याच लहरीपणाने उतरले आणि तसेच मोटार व विमान बांधणी क्षेत्रातही ते याच उतावीळपणाने शिरले.

   

१९३९ मध्ये एका अमेरिकन व्यवस्थापकाच्या ओळखीच्या निमित्ताने त्यांनी विमान बांधणी व्यवसायात प्रवेश करण्याचे ठरविले. आणि ‘हिंदूस्तान एअरक्राफ्ट’ ही कंपनी म्हैसूर संस्थानाच्या मदतीने बंगलोर (बेंगळूरू) येथे सुरू केली. पण पुढे सुरक्षेच्या गरजेमुळे ही कंपनी भारत सरकारने राष्ट्रीयीकरण करून आपल्या ताब्यात घेतली. ही कंपनी व  वालचंद शेठजींचं नाव विमान बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य आहे.

वालचंद शेठजींनी पुढे मोटार बांधणी क्षेत्रात उडी घेतली. त्यांनी १९४५ मध्ये मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत. वालचंद शेठजींनी सुरू केलेल्या उद्योगधंद्यांत रावळगाव शुगर फॅक्टरी, वालचंदनगर इंडस्ट्रीज, अॅक्रो इंडिया कपर इंजिनिअरिंग लिमिटेड, इंडियन ह्यूम पाईप कंपनी इत्यादींचा समावेश आहे. वालचंदजींनी कृषितंत्रज्ञान व संबंधित उत्पादने या क्षेत्रातही कार्य केले.

शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते, अतिशय कर्मपरायण होते. आपल्या हाताखालील माणसांच्या आणि अधिकार्‍यांच्या विकासाकडे त्यांचे बारीक लक्ष असे. आपल्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी ते कौशल्यनिपूण तंत्रज्ञ नेमत. त्यांनी पत्रकारिता, जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यम यांची ताकद ओळखली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्याचा अतिशय प्रभावी रीतीने उपयोग करून घेतला. ते शिक्षण आणि आधुनिकता यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या या आधुनिकतेच्या आग्रहामुळेच त्यांच्या रावळगाव शुगर फॅक्टरीला सर्वांत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा कारखाना होण्याचा मान मिळाला होता.

‘वालचंद शेठजी यांचा कामातील जोम एखाद्या मिशनर्‍यासारखा असायचा’, असं त्यांचे एक सहकारी द्विजेंद्र त्रिपाठी म्हणतात. त्यांचं कामामधील झपाटलेपण, त्यांची निष्ठा, काम वेळेत पूर्ण करण्याचा आग्रह आणि कामातील चोखपणा व परिपूर्णता यामुळे त्यांची ही मिशनरी वृत्ती सगळीकडे दिसून येत असे.

भारतातल्या अनेक उद्योगधंद्यांचा पाया रचणार्‍या या अलौकिक उद्योगपतीची-वालचंद हिराचंद दोशी यांची - ओळख औद्योगिक क्षेत्रातली एक जणू दंतकथाच बनून राहिली आहे. सोलापूरमधून सुरू झालेला हा अलौकिक प्रवास १९५३ मध्ये सिद्धपूर येथे संपुष्टात आला. पण वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा मात्र नेहमीच आपल्या स्मरणात राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel