विचार, उच्चार व आचार या सर्वच बाबतीतील महात्मा गांधीजींचे सच्चे अनुयायी आणि ‘जय जगत’चा घोष करणारे भारतातील थोर आध्यात्मिक नेते !
भारतीय समाजाला एक नवी दिशा व प्रेरणा देणार्यांमध्ये विनोबा भावे हे एक महत्त्वाचे नाव आहे. विनोबाजींचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते आणि आपले आयुष्य देशसेवेसाठीही वाहून घ्यायचे होते. हर तर्हेच्या बंधनातून मुक्त होऊन समाजाची सेवा करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गाकडे मन आकर्षित होऊ नये यासाठी त्यांनी आपली सगळी शैक्षणिक प्रमाणपत्रे चुलीत जाळून टाकली. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले खरे परंतु वाटेत सुरत स्टेशनवर ते उतरले व तेथून भुसावळमार्गे काशीला गेले. काशीला त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.
त्यानंतर ते गांधीजींना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले. गांधीजी त्यांचा साधेपणा, संयम आणि सेवाभाव पाहून प्रभावित झाले. त्यांनी विनोबाजींना अहमदाबादमधल्या आश्रमातच राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादेतील आश्रमातून ते एका वर्षाची सुट्टी घेऊन वाईला गेले. तेथे त्यांनी प्राज्ञ पाठशाळेत राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला.
१९२१ साली ते आपल्या काही सहकार्यांसोबत वर्ध्याला जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी सेठ जमनालाल बजाज यांच्या साहाय्यानेसत्याग्रह-आश्रमाची स्थापना केली. जमनालाल बजाजांनी विनोबाजींना आपले गुरू मानले होते. या आश्रमात प्रवेश करण्यासाठी लिंग, जात, धर्माचे कोणतेच बंधन नव्हते. विनोबाजींनी वर्ध्याजवळील पवनार येथे ‘परमधाम’ आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात असत.
केरळ प्रांतात वाईकोम नावाचे तीर्थस्थान आहे. येथील शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता ब्राह्मणांच्या वस्तीतून जायचा. हा मार्ग ब्राह्मणांनी अस्पृश्यांसाठी शेकडो वर्षे बंद ठेवला होता. याविरुद्धच्या १९२४ मधील सत्याग्रहाचे नेतृत्व विनोबाजींनी केले.
स्वातंत्र्यलढ्यात १९३२ साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन द्यायला सुरुवात केली. जेलमध्येच ही प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे ती ‘गीता प्रवचने’ म्हणून प्रकाशित करण्यात आली. ‘गीताई’ या ग्रंथाद्वारे विनोबाजींनी गीतेचा मराठी अनुवाद केला. (सर्वसाधारण वाचकासह आध्यात्मिक साधक व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनाच ‘गीताई’ आजही मार्गदर्शक ठरते आहे.) त्यांना गुजराती, बंगाली, उडिया, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, उर्दू, अरबी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवनदृष्टी, अभंगव्रते, स्वराज्यशास्त्र असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
१७ ऑक्टोबर, १९४० पासून म. गांधींनी ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. यातील पहिले सत्याग्रही म्हणून गांधींजींनी विनोबा भावे यांची निवड केली होती. विनोबाजी कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाची सर्व पूर्वतयारी विनोबाजींच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना केली. १९५१ साली त्यांची अभूतपूर्व अशी ‘भूदान’ चळवळ सुरू झाली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ग्रामदान, ग्रामराज्य, संपत्तीदान या संकल्पनांचाही त्यांनी चळवळीत अंतर्भाव केला. या अनोख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शांततापूर्ण मार्गाने असंतुलित जमीन मालकीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. याचळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना बहाल केली. ‘सब भूमि गोपाल की’ हा या चळवळीचा नारा होता. दरम्यान आपल्या आध्यात्मिक, मानवतावादी विचारांच्या साहाय्याने चंबळच्या खोर्यातील दरोडेखोरांचे मतपरिवर्तनही केले. राजकीय कार्य, भूदान चळवळ या गोष्टी एकीकडे करत असतानाच समांतरपणे, सातत्याने चालू असलेली प्रखर आध्यात्मिक साधना हे त्यांच्या जीवनाचे मुख्य वैशिष्ट्य होय.
आचार्य विनोबाजींनी ऋग्वेदास, वेदान्तसुधा, गुरूबोधसार, भागवतधर्म प्रसार इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विचार मांडले. तसेच त्यांनी ‘मधुकर’, ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकांतूनही लेखन केले. धर्म, अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा इत्यादी विषयांवरील लेखन त्यांनी नियतकालिकांतून केले. त्यांचे लेखन आणि आध्यात्मिक व राजकीय कार्य यांमुळे त्यांना जयप्रकाश नारायण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे अनुयायी लाभले.
अशा या प्रतिभावंत, निश्चयी महात्म्याचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले. १९८३ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले.