खूप हुंदडून झाल्यावर

तिनसान झाली की

खाडीजवळच्या पुळणीत

उंडलीच्या झाडाखाली

एकटेच

सपशेल उताणी पडून

- अजून काळोख

झाला नसला तरी -

वर चांदण्या दिसतात का

पहायचे.

अगदी एकाच ठिकाणी

एकटक

पहात रहायचे.

जिथे दृष्‍टी लावली असेल

तिथे मग

खरोखरच एक चांदणी

दिसू लागते.

मग पुन्हा

ती तशीच दुसरीकडे

लावायची.

तिथेही आणखी एक

उमलतेच.

थोडयाच वेळात

हा चाळा

करावाही लागत नाही.

काळोख वाढतो

तशा चांदण्याच

आपल्याकडे

टकटक पाहू लागतात.

एकेकदा वाटेलही

उंडलीच्याच झाडाखाली का ?

आजी तर सांगते

तिथे वर एक समंध आहे.

पण

मनाला सांगायचे :

तोच हे सगळे दाखवतो आहे.

तो म्हणत असणार,

’लोक उगाच माझी

धास्ती घेतात

मलाही मुले आवडतात.

उन्हात

खूप खेळून झाल्यावर

निवार्‍याला

या खाडीच्या काठावर

आणखी दुसरे झाड तरी

आहे काय ?

मीच

ऊन आणि थंडी खात

वर बसून रहायला

नको काय ?’

आपल्याला

हे त्याच्या मनातले

सगळे समजत असते.

आपणही

मनातून त्याच्याशी

असेच काही बोलत असतो.

काळोख वाढला

की घरी परतायचे असते.

तोच आपल्याला उठवतो

हळू कानात सांगत,

त्याच्याच भाषेत,

’आता उदया !’

आजीला मात्र

हे सांगून उपयोगाचे नसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel