ढगाएवढा राक्षस

काळा काळा कुट्‌ट,

डोंगरदरीत निखळून पडलाय

त्याचा मोठ्ठा बूट !

काळोखातील वडावरुन

भूत मारते उडी,

पारंब्यांतून त्याची मला

लांबून दिसते दाढी !

रात्री माझ्या स्वप्‍नात येते

सोनचाफी कळी

हळूच उघडते डोळे आणि -

होते तिची परी !

कधी कधी उडत येतो

रुख पक्षी घरी,

पाहयला जातो लटकून त्याला

सिंदबादची दरी !

धपकन खाली दरीत पडतो

- आणि उघडतो डोळे,

कसा कुठून जाऊन आलो

काहीच कसे नकळे !

आई म्हणते, "काय रे झाले,

पाहतोस काय खालीवर ?"

गंमत जंमत सांगू कशी

कसा गेलो वर वर ?

काळाकुट्ट मोठ्ठा राक्षस

कसा होता सांगू मी ?
कशी नाचली सोनपरी

नाचून कसा दाखवू मी ?

"थांब आई, सांगतो तुला

कशी होती सोनपरी

अन् दाखवतो काढून तुला

हिर्‍या-माणकांची खोल दरी !"

पेन्सिल घेऊन कागदावर

राक्षसाचा काढला कान,

माझ्या मनातल्या स्वप्नांची

चित्रे झाली छान छान !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel