त्या तरुणाचे नाव दिगंबर होते. नावाप्रमाणेच त्याची वृत्ती होती. सांसारात त्याचे लक्ष नव्हते. संन्यासाकडे त्याच्या मनाचा ओढा होता. त्याने वेदान्ताचा चिकित्सापूर्वक अभ्यास केला होता. विशेषत: अद्वैत तत्त्वज्ञानाचा तो अभिमानी होता. त्याने लग्न वगैरे केले नाही. तो घरी राही. मोठे होते ते कुटुंब. दिगंबर कधी कधी शेतातही खपे, राबे. जरूर पडली म्हणजे घरच्यांस मदत करी. परंतु नेहमीचे काम म्हणजे एकांतात बसणे, मनन करणे, ध्यानधारणा करणे. घरातील मुलांच्या मनोवृत्तींना वळण लावण्यातही त्याचा वेळ जात असे.
या दिगंबराचा वडील भाऊ अकस्मात मरण पावला. त्या भावाने मरताना दिगंबराला सांगितले, ''दिगंबर, माझ्या सर्व मुलींची लग्ने वगैरे तू कर. तुला तुझा संसार तू अंगावर घे.'' मरणोन्मुख बंधूला दिगंबराने त्याप्रमाणे वचन दिले. विरक्त दिगंबराला भावाच्या मुलींची लग्ने ठरविण्यासाठी गावोगाव जावे लागे. किती यातायात, किती विचित्र अनुभव! शेकडो ठिकाणी मुलींना नेऊन दाखवण्यात त्याला अपमान वाटे. मुली म्हणजे का बाजारातील विक्रीच्या चिजा? परंतु दिगंबराला सर्व संताप पोटात साठवावा लागे.
भावाच्या शेवटच्या मुलीचे लग्न झाले. दिगंबर दिलेल्या वचनातून मोकळा झाला. तो आता घर सोडून निघाला. लहान जग सोडून तो बाहेर पडला. परिव्राजक होऊन भारतमातेला प्रदक्षिणा घालावयासाठी तो निघाला. पक्षी बाहेर पडला. पूर्वी या देशात किती तरी साधुबैरागी गंगेला, नर्मदेला प्रदक्षिणा घालीत; तीरातीराने जात; दलदलीतून, घनदाट जंगलातून जात. त्यांना किती तरी आपत्ती येत, संकटे सहन करावी लागत. कधी वाघ भेटे. कधी मगर गिळावयास येई, परंतु मोक्षाच्या त्या यात्रेकरूंना भय वाटत नसे. त्यांच्या त्या प्रदक्षिणा चित्तशुध्दीसाठी असत. आपल्या देशाची नि अज्ञात प्रदेशात रोवून साम्राज्ये वाढवावी, अशी दृष्टी भारतीय यात्रेकरूत नसे. ते हिमालयावर चढत, ते गंगेला प्रदक्षिणा घालीत; परंतु हे करताना ईश्वराचे भव्य वैभव पाहून विनम्र होणे, याहून अन्य हेतू त्यांचा नसे. स्वच्छ हिमालय पाहून जीवन स्वच्छ करावे असे त्यांना वाटे. गंगेचे निर्मळ पाणी पाहून चित्तही गंगाजळासारखे व्हावे, असे त्यांना वाटे.
दिगंबर निघाला. तो निर्भय होता. तो धिप्पाड दिसे. त्याची छाती रूंद भरदार, वज्राची होती. त्याचे दंड पिळदार होते. त्याच्या तोंडावर तपश्चर्ये व वैराग्याचे पवित्र व प्रखर तेज तळपत होते. हिंडता हिंडता मध्ये एका झाडाखाली डोळे मिटून तो ध्यानस्थ बसे. त्या वेळी जणू योगीराणा शिवशंकर बसला आहे की काय, असा भास होई.
हिंदुस्थानात त्या वेळेस स्वराज्याची साधना सुरू होती. नानाविध चळवळी सुरू होत्या. कोणी हरिजनसेवेस वाहून घेत होते. कोणी खेडयांना पुन्हा पूर्वीची भाग्यकळा यावी, म्हणून ग्रामोद्योग सुरू करीत होते. कोणी खादीसाठी वेडे बनले होते. हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी कोणी तडफडत होते. शास्त्रीय गोरक्षणाच्या कार्यास कोणी जीवने देत होते. कोणी सर्वांस समजेल अशा राष्ट्रभाषेचा, हिंदुस्थानाचा प्रचार करीत होते. काहींना तर किसान व कामगार यांच्या संघटनेस सर्वस्वी वाहून घेऊन सर्व दु:खांच्या व अन्यायांच्या मुळाशीच हात घातला. हिंदुस्थानात असे विराट कार्य सुरू झाले. या सर्व चळवळीचा शेवट देशाला खरे स्वातंत्र्य देण्यात होणार होता.