मैना म्हणाली, - आपल्या मनात म्हणाली, ''माझ्या आईबापांना ह्या लग्नामुळे सुख वाटत आहे ना? त्यांना ह्यात आनंद आहे ना? ठीक. जन्मास येऊन कोणाला तरी सुख दिले म्हणजे झाले. माझ्या सुखाची होऊ दे राख; परंतु त्या राखेतून माझ्या आईबापांस धन्यता लाभत असेल तर ती राखही मला प्रिय आहे. देवा, या लहान जयंतास पुढे ददात पडू नये म्हणून माझे बाबा आज कठोर होत आहेत, या मैनेला निर्दयपणे नरकात लोटीत आहेत. जयंता, तुझी बहीण तुझ्या सुखाच्या आड येत नाही हो. तू उदंड आयुष्याचा हो, सुखात नांद. मोठा हो व सुखाने संसार कर!''
वृध्द नवरदेव वधूमंडपात येण्याची वेळ झाली. वाद्यांचे गजर होत होते. बार होत होते. त्या सारंगगावात अशी टोलेजंग मिरवणूक आजपर्यंत कधीही निघाली नव्हती. आजूबाजूच्या अनेक गावचे लोक लग्नसोहळा पाहण्यासाठी आले होते. सारे सारंग गाव गजबजले होते. नवरदेवावर छत्र-चामरे ढाळली जात होती. अब्दागीर धरण्यात आली होती.
मंडपात भिक्षुकांची गर्दी उसळली होती. राधेगोविंद महाराज आपल्या शिष्यांसह गादीवर लोडाशी बसले होते. ते मधून पान खात होते, तपकीर ओढीत होते. मुखाने राधेगोविंद मधून मधून नामोच्चारण होत होते. मोठमोठी प्रतिष्ठित मंडळी मंडपात बसली होती. कसा भरगच्च दिसत होता मंडप. उकाडा होत होता. विझणवारे सुरू झाले. दोरीचे पंखेही ओढले जाऊ लागले.
सारा गाव हा सोहळा पाहण्यासाठी लोटला होता. फक्त गोपाळ गावाबाहेर त्या बकुळीच्या झाडाखाली म्लानमुख असा बसला होता. त्याच बकुळीच्या झाडाखाली मैनेने एकदा दुपारी ते गोड गाणे म्हटले होते. 'हृदयदेवा होई जागा,' असे ती म्हणत होती. परंतु मैनेचा हृदयदेव आज रडत होता. त्या वाद्यांचे आवाज कानांवर येऊ नयेत म्हणून गोपाळ कानात बोटे घाली; परंतु तरीही ते आवाज कानांत जात, ते बार कानांत घुमत. अशुभ गोष्टीची वार्ता नको असली तरी कानांवर येत असते.
सायंकाळी होत आली. गोरज मुहूर्तावर लग्न होते. वाद्ये थांबली होती. मंगलाष्टके म्हटली जात असतील. शुभ मंगल म्हणून अक्षतांचा वर्षाव केला जात असेल. परंतु अ-क्षत असे सुख मैनेला मिळणार आहे का? ती अक्षत सुखाची वृष्टी लोक करीत होते की, कायमच्या शोकाची वृष्टी करीत होते? शुभ मंगल सावधान, हे शब्द ऐकून मैना थरथरे. ती दचके. किती पोकळ, अर्थहीन शब्द! ते शब्द उच्चारणा-यांच्या मनात वधूवरांची काही तरी कल्पना असते का? वधूवरे खरोखर परस्परांस अनुरूप आहेत की नाहीत, या विवाहमधून मंगलाची निर्मिती होईल की अमंगलाची, याची कल्पना चुकून तरी त्यांच्या मनात येते का? की त्यांच्या डोळयांसमोर दक्षिणा असते? तो थाटमाट असतो? ती वाजंती असतात? ते मंडप असतात? ते अत्तरगुलाब, ती फुले, ती पानसुपारी, हे असते?
नदीच्या तीरावर बंदूक घेऊन नोकर बसले होते. सूर्य अस्तास जाताच ते बंदुका वाजवणार होते; की तिकडे टाळी लागणार होती. सूर्य अस्त्यास गेल्यावरच का बरे लग्न लावायचे? जी अशुभ लग्ने आपण लावीत आहोत, ती त्या सूर्यनारायणाने पाहू नयेत, असे तर ती लग्ने जमवणा-यांस नसेल ना वाटत? ज्या लग्नाचे पोरखेळ आपण केले ते कशाला दाखवा त्या सत्यनारायणास, त्या सूर्यनारायणास?
जा! सर्व सृष्टीला ऊब देणा-या, प्रकाश देणा-या, हे मित्रा सूर्यनारायणा, अस्तास जा. तू सर्व सृष्टी सजीव राखतोस. झाडेमाडे फुलवतोस, फलवतोस. धनधान्याने सृष्टी सजवतोस. तू नसशील तर सृष्टीचा अंत होईल. त्या सृष्टीला सजीव राखणा-या देवा, जा! तू हा अमंगल विवहा नको पाहूस. मैनेच्या जीवनाची कळी कुस्करून टाकणारा हा विवाह, मैनेच्या जीवनात चिर अंधार आणू पाहणारा हा विवाह, मैनेच्या जीवनाची राखरांगोळी करणारा हा विवाह, तिच्या सर्व मनोरथांना मातीत मिळविणारा हा विवाह - नको, नको तू तो पाहूस.
सूर्य आज रोजच्यापेक्षा का अधिक लाल दिसत होता? त्याला का संताप आला होता? अजून जात कसा नाही खाली? आज मावळत का नाही लौकर? मैनेचा सुखसूर्य मावळणार म्हणून का तो खाली जाऊ इच्छित नाही? आपण खाली जाताच मैनेची मान कायमची खाली होणार आहे म्हणून का तो घुटमळत आहे? जा, सूर्या, जा! जे होणार ते होणार. तू घटका, अर्धी घटका, फार तर तो अशुभ क्षण लांबवशील. परंतु तो क्षण येणार आहे. तो चुकणार नाही. समजले, सूर्याला समजले. घुटमळण्यात अर्थ नाही ही गोष्ट त्याला समजली. तो पहा झपाटयाने खाली चालला देव. बंदुका सरसावण्यात आल्या. तिकडे मंगलाष्टके म्हणून भिक्षुक कंटाळले. नवरदेवांना केव्हा सुटतो असे झाले. मैनेला केव्हा एकदा कोप-यात जाऊन रडते असे झाले. नवरदेवास जोराचा खोकला येणार होता. मैनेला मर्च्छना येऊ पहात होती. निश्चयाने ती उभी होती. आईबापांच्या अब्रूसाठी ती उभी होती. मावळ, सूर्यनारायणा, मावळ.