''नाही तर काय?''
''जगून तुम्हाला पाहता यावे, यासाठी फक्त मी मरणाला भिते. तुम्हाला पाहण्याची इच्छा हृदयातून मेली असती, तर कधीच मीही मेले असते. मैना मरणाला भीत नाही. मी समुद्रात उडी घेईन, आगीत शिरेन, विष तोंडाला लावीन. मैनेने मरण कधीच जिंकले आहे. मैना ब्रह्मवादिनी आहे. माझे बाबा म्हणत, ''मैना ब्रह्मवादिनी होईल.''
''हे ब्रह्मवादिनी, दे तर तुझा हात. तुझा हात मिळून मलाही ब्रह्म मिळू दे. मलाही मरणाची भीती दवडू दे.''
नदीपलीकडे दोघे आली.
''आता तुम्ही एकटे जाल ना परत?''
''हो जाईन. गुप्त रूपाने तू माझ्याजवळच आहेस. वाहू लागलो तर तू धरशील, बुडू लागलो तर तू काढशील. तू पुरात पोहणारी. मला ती सवय नाही. मी कमरभर पाण्यात पोहतो. जा आता तू. मीही जातो.''
ती गेली. तोही गेला.
घरी बाळ रडतच होता. माता त्याला आंदुळीत होती. मैनेने त्याला अंगारा लावला. काय आश्चर्य? त्याचे रडे थांबले. कोणाचा विश्वास बसो वा न बसो. जगात चमत्कार आहेत. त्या सर्व चमत्कारांचा निर्णय शास्त्रीय बुध्दीस सर्वस्वी होतो, असे नाही.
''मैने थांबले हो रडे बाळाचे. पुण्यवान आहेत ते. योगी आहेत ते. मी तर त्यांचीच दृष्ट पडली म्हणत होते. आपण अजाण संसारी माणसे. वेडेवाकडे मनात आणतो. काही तरीच मेलं.'' माता म्हणाली.
''होय आई, ते पुण्यवंत आहेत. गावातील फुलांपेक्षा त्यांच्या हातांनी मिळणा-या पाण्याने जी फुले फुलतात, ती अधिक सुंदर दिसतात, अधिक सुगंधी दिसतात. नेहमी देवा-महादेवाजवळ जप करीत बसतात.'' मैना म्हणाली.
''ते कोठले कोण? त्यांना कोणी नाही का?''
''कोणी नाही. त्यांना आई ना बाप. बहीण ना भाऊ. ते अगदी एकटे आहेत. ते अति विद्वान आहेत. कोणी एक मोठा राजा त्यांना एकदा आपल्या पदरी ठेवीत होता; परंतु ते राहिले नाहीत. 'राजाच्या दरबारात राहिल्याने ज्ञान मरते. ज्ञान मोकळेपणात वाढते.' असे त्यांनी सांगितले. ते जेथे जातात, तेथे विचार पेरतात, फुले फुलवितात. एके दिवशी ते म्हणाले, ''मेघासारखे माझे जीवन. कधी विचारांनी व भावनांनी ओथंबून खाली येतो, लोकांवर वृष्टि करतो. कधी मी स्वत:ला शून्य करून अनंत आकाशात उंच उडून जातो व परब्रह्मात मिळून जातो. कधी मी गंभीर दिसतो, कधी खिन्न दिसतो, कधी प्रेम व आनंद यांनी रंगून जातो.'' आई ते जणू अवलिये आहेत.''
''त्यांना घरदार करायचे नाही का? असेच का राहणार विरक्त व एकटे?''
''त्याचे काही ठरलेले नाही. कोणी विचारले तर ते हसतात, दुसराच विषय काढतात.''
''मैने, तू काय करणार? ब्रह्मवादिनी ना होणार?''
''मला नाही माहीत! बाबा काय म्हणतात?''
''ते अलीकडे काही बोलत नाहीत फारसे; परंतु तुझ्या मनात काय आहे?''
''बाबा ठरवितील ते खरे. त्यांची इच्छा ती माझी. आम्हां मुलींना का स्वतंत्र मने असतात?''
''तुला स्वतंत्र मन नाही?''
''असून काय उपयोग आई.''
मैना निघून गेली. तिला स्वयंपाक करावयाचा होता.