बरेच दिवस गेले. मैनेचा भाऊ बोलू लागला, चालू लागला. धोंडभटजींचा तो आता देव झाला होता. धोंडभटजी आता देवळात जात नसत, पुराण सांगत नसत. हे लहान लेकरू खेळवणे यातच त्यांचे जीवनसर्वस्व होते. स्नानसंध्या, जपजाप्य म्हणजे जयंताला खेळविणे.
एके दिवशी मैना बाहेरून आली. ती ओसरीवर उभी होती. आत बोलणे चालले होते. तिच्या लग्नाच्या वाटाघाटी चालल्या होत्या. ती एकदम आत गेली. गोष्टी थांबल्या. का थांबल्या? मैना का लहान होती? तिला सारे समजत होते. ती वयाने मोठी झाली होती, मनाने मोठी झाली होती. का मग लपवालपवी? आईबाप तिच्यापासून त्या गोष्टी का लपवीत होते?
मैनेला चुटपूट लागली, काही तरी काळेबेरे आहे, असे तिने जाणले. लग्नाच्या गोष्टी म्हणजे मंगल गोष्टी; परंतु या मंगल होत्या की अमंगल होत्या? मैनेच्या तीक्ष्ण मनाला घाणीचा वास आला. एके दिवशी मैना सचिंत बसली होती. घरात तिला मोकळेपणा वाटेना. आपल्याविरूध्द काही तरी कट चालला आहे अशी तिला शंका येऊ लागली. ती घरातून बाहेर पडली. ती एकदम त्या शिवालयात आली. त्या शिवालयात तिचा प्राण नव्हता. तेथे फक्त दगडाची पिंडी होती. दगडाचा नंदी होता. कोठे गेला गोपाळ? कोठल्या कुंजवनात गेला? कोणत्या कालिंदीच्या तटी गेला? कोणत्या राधेने त्याला भुलविले? कोणत्या गवळणीने मोह पाडला.
मैनेने तेथील फुले तोडली. फुलांचा हार तिने गुंफून तयार केला. मधून मधून दुर्वांकूर व सुंदर पाने तिने गुंफिली. माळ तर तयार झाली; परंतु कोणाच्या गळयात ती घालावयाची? कोठे आहे वनमाळेचा भोक्ता वनमाळी? कोठे गेला तो मुरलीधर?
तो पहा गोपाळ आला. मैनेचे म्लान मुख चमकले, फुलले.
''केव्हा आलीस?'' त्याने विचारले.
''किती तरी युगे झाली!''
''किती सुंदर माळ!''
''तुमच्या गळयात किती सुंदर दिसेल! करू दे तुमची पूजा. बसा येथे शिलाखंडावर. तुम्ही माझे देव, महादेव.''
''मैने, तू वेडी आहेस. तू मला कशी माळ घालणार? तुझी माळ माझ्यासाठी नाही. तुझी माळ श्रीमंतासाठी आहे. गोपाळ गरीब आहे.''
''तुमच्याहून कोण श्रीमंत आहे? जी संपत्ती मला पाहिजे, ती तुमच्याजवळच आहे. तुम्ही माणे कुबेर. माझे जडजवाहीर सारे तुमच्याजवळ आहे. इतरांजवळ काय आहे? दगड नी धोंडे. तुमची श्रीमंती जगाला दिसणार नाही. या मैनेच्या डोळयांना मात्र मी दिसते. करू ना तुमची पूजा?''
''मैने!''
''काय?''
''तू का आपल्या वडिलांच्या इच्देविरूध्द जाणार?''
''काय आहे माझ्या वडिलांची इच्छा?''
झाडामाडांनासुध्दा ती माहीत झाली आहे. पशुपक्ष्यांना कळली आहे. चराचराच्या कानावर गेली आहे.
''माझी मैना ब्रह्मवादिनी होईल, ही ना माझ्या बाबांची इच्छा?''
''नाही. माझी मैना श्रीमंताची राणी होईल, ही आहे त्यांची इच्छा.''
''काही तरीच! माझे बाबा गरीब आहेत. माझे लग्न त्यांना करायचेच असेल, तर एखाद्या गरिबाशी करतील.''