''मैने, तू माझे ऐक. अनुरूप पती मिळव व लग्न कर. तुझा संसार सुखाचा होईल. तुझ्याजवळ विचार आहेत, धैर्य आहे. तू स्वत: संयम शिकून पतीलाही शिकवशील. मैने, इंदू अति दु:खी आहे. आमच्या घरी काडीचा संयम नाही. दिवस नाही, रात्र नाही. अनिच्छा दाखवली की मारतात. लटके हसावे लागते, खुलावे लागते. काय सांगू मैने? असला संसार म्हणजे नरक नव्हे तर काय? कसली पतिनिष्ठा नि काय? कसे तरी रहावयाचे.''
''आपण स्त्रियांनी बंड केले पाहिजे.''
''आपण अबला आहोत.''
''आपण मारू नाही शकलो, तर निदान मरू शकतो. का हावे अशा स्थितीत?''
''मैने, पोटच्या गोळयाकडे पाहून रहावे, असे वाटते. ती एक वेडी माया ईश्वराने लावून ठेविली आहे.''
''सर्वत्र का असेच प्रकार असतील?''
''कोठे कमी, कोठे जास्त; परंतु प्रकार तोच.''
''मैने, हा बघ हिरवा किडा, हिरव्या गवतावरचा हिरवा किडा.''
''परिस्थितीप्रमाणे तो राहतो. हिरव्या पानात त्याच हिरवा रंग आहे. उद्या हे गवत वाळू लागले, भुरे होऊ लागले की, याचा रंगही भुरा होतो. परिस्थितीमुळे प्राणिमात्राच्या जीवनाला परिस्थिती रंगविते.''
''परिस्थितीला बदलील तो खरा माणूस. परिस्थितीप्रमाणे रंग बदलणारे ते का मानव? त्यांच्यात व या किडयांत काय आहे अंतर?''
''या किडयांचे काय ग काम आहे जगात?''
''आणि मानवांचे तरी काय आहे?''
''मानव मातीतून अमृतत्व निर्माण करील, दगडांतून सुंदर मूर्ती निर्माण करील. इंदू, मानव हा किती झाले तरी वर मान केल्याशिवाय राहणार नाही. तो धडपडेल, पडेल; परंतु शेवटी वर चढेल. मानव सृष्टीचा अलंकार आहे. मानवाचा मोठेपणा सर्वत्र दिसत आहे.''
''मला तर काठेच दिसत नाही. मानव राजवाडे बांधतात, मुंग्याही वारूळे बांधतात. ते बघ पलीकडे केवढे आहे वारूळ! कशी असते रचना! आणि पाखरे घरटी बांधतात. फांद्यांना लटकत असतात. बाहेरून ओबडधोबड दिसणा-या त्या घरटयांच्या आत किती मऊ मऊ जागा असते. लोकरीचे, कापसाचे धागे वेचून आणून आपल्या पिलांसाठी कधी करतात जागा तयार. आणि मैने, नर व मादी दोघेजण घरटे बांधण्यासाठी खपत असतात. किती त्यांच्यात प्रेम व सहकार्य? मानव, मानवात काही नाही. मानव सर्वांचा संहार करतो. स्वत:च्या जातीचाही करतो. हा मानवप्राणी पाखरे मारील, हरणे मारील. सारे याला पाहिजे. त्याला व्याघ्राजिने पाहिजेत. मृगाजिने पाहिजेत. मैने, मला या मानवाचा वीट आला आहे.''
''इंदू, अशी निराश नको होऊ. तुझ्या लहान गोविंदाला तू विटलीस का?''
''खरेच, तो घरी रडत असेल. चल जाऊ. आपण किती वेळ बालतच बसलो. चल मैना.''
''आजीने त्याला खाऊ दिला असेल. आजीचा तो आवडता आहे. 'एक पाय नाचव रे गोविंदा। घागरीच्या छंदा' वगैरे म्हणून ती त्याला खेळवीत असते.''
''आमच्या आईपेक्षा आमच्या आजीलाच या पणतवंडांचे कौतुक.''
''सावकाराला मुद्दलापेक्षा व्याज अधिक का आवडते, त्याप्रमाणे माणसाला स्वत:च्या मुलापेक्षा नातवंडे, पणतवंडे अधिक आवडतात.''