''अगं, कसले मुत्सद्दी! राज्ये तर जात चालली. तो टोपीवाला म्हणे सर्वत्र शिरजोर होत आहे. कोणी म्हणतात ते वानरांचे वंशज आहेत. रामाने त्यांना वर दिला होता की, कलियुगात तुम्ही राज्य कराल. गोरे लालबुंद असतात, असे म्हणतात.''
''अगं, आपणांपेक्षा शूर असतील, ख्यालीखुशाली कमी करीत असतील, म्हणून होतो आहे त्यांचा जय. चिमणाजी अप्पा पेशव्यांनी शत्रूची सुंदर पत्नी परत केली. तेव्हा ती म्हणाली, ''दुष्मन खरा पण दाणा आहे.' अशांना जय मिळाल्याशिवाय कसा राहील?'' परंतु आता ते बाजीराव आहेत म्हणतात. त्यांच्या कारकीर्दीत स्त्रीला संरक्षणच नाही. कशी टिकतील राज्ये?''
''का ग मैने, तिकडे ते पानिपत जेव्हा झाले व नानासाहेब पेशवे मदतीसाठी वर उत्तरेकडे जात होते, तर वाटेत त्यांनी लहानशा मुलीजवळ लग्न लावले?'' तिकडे पानिपतावर मराठे कैचीत सापडलेले आणि यांना वाटेत सुंदर लहान मुलीला माळ घालण्याचे डोहाळे सुचतात! म्हणून आपली राज्ये गेली.
''इंदू कोठे ऐकलेस हे सारे तू?''
''अगं, सासरी ओसरीवर चालतात गप्पा. येतात कानावर.''
''माझे असल्या गोष्टीत लक्ष नसते. मला गीता आवडते. भाकडकथा मला आवडत नाहीत-खरेच नाही आवडत.''
''तू ब्रह्मवादिनी होणार आहेस. होय ना? हो! तुझ्या पुण्याने आम्ही उध्दरून जाऊ.''
''इंदे, निजा की आता. किती वेळ बोलत बसणार तुम्ही? तुम्हांला बोलण्याची लाजच नाही! त्यांच्या घरी यायच्या वेळा होतील, तरी तुम्ही आपल्या जाग्याच. खबरदार आता बोलणे ऐकू आले तर! जा अंथरुणावर पडा एकदाच्या. जरा डाळिंब्या काढायला या म्हटले, तर हात दुखत होते दोघींचे. गडयांना चेपायला सांगू का जरा? जशा काही राजाच्या राण्या.''
इंदूची चुलती बोलत होती. मोठी फटाकडी होती ती. इंदूची आई होती गरीब. माहेरी आलेल्या मुलीला जाऊबाईंनी असे बोलावे, याचे तिला वाईट वाटले; परंतु ती बोलली नाही. शब्दाने शब्द वाढतो, घराची शोभा होते.
असे दिवस जात होते. मैनेमध्ये स्थित्यंत होत होते. जीवनाच्या नाना छटा तिला कळू लागल्या. तिच्यात असा फरक होत असतानाच तिच्या घरी, त्या सारंग गावी, त्या अंजनी नदीच्या तीरावरील त्या पडक्या शिवालयात फरक होत होता. त्या शिवालयात एक बालयोगी रहावयास आला. त्याची कांती कर्पूरगौर होती. जणू शिवशंकरच मनुष्यरूपाने अवतरला होता. तो गावात मधुकरी मागे व त्या पडक्या शिवालयात राही. त्याने आजूबाजूला झाडून स्वच्छ केले. तेथे त्याने फुलझाडे लाविली. शिवालयाजवळ विहीर होती, तिचे पाणी त्या फुलझाडांना तो घाली. तोंडाने उपनिषदे म्हणजे, वेदमंत्र म्हणे, गोड स्तोत्रे म्हणे. तो कोणापाशी बोलत नसे. काही दिवस गेल्यावर मौन सुटायचे होते. असा हा तरुण होता. तो कोठला, कोण कोणासही माहीत नव्हते. त्या शिवालयात गावातील मंडळी मधूनमधून येऊ लागली. या बालस्वामीला ती प्रणाम करून जात.
शिवरात्रीचा तो दिवस होता. त्या पडक्या शिवालयाकडे कधी आली नव्हती इतकी गर्दी आज आली होती. आज त्या तरुणाचे मौन सुटावयाचे होते. वेदान्ताचे शब्द ऐकायला लोक अधीर होते. त्या दिवशी त्या तरुणाने दोन घटका वेदांताचे असे काही सुंदर विवरण केले की, सारे तटस्थ राहिले. तेथून जावे असे कोणास वाटेना. शेवटी सायंकाळ होऊ लागल्यामुळे लोक माघारे गेले.
गावातील स्त्री-पुरुष त्या शिवालयाकडे कधी जात नसत, परंतु आता लोक जाऊ येऊ लागले. त्या तरुणाजवळ येऊन बसत, बोलत. तो तरुण खूप विद्वान आहे, अशी सर्वांची खात्री झाली. त्याचे विचार ऐकून सर्वांना आश्यर्च वाटे. हा बालशुक्राचार्यच अवतरला आहे, असे ते म्हणत. वेदांतातील कठीण कठीण गोष्टी तो सोप्या रीतीने समजावून देई.