''ती कोणाला वेड लावणार नाही? मैना प्रेमळ आहे, मायाळू आहे. गुणांची आहे पोर. कशी हसत गेली? माझी समजूत घालीत होती. मी खरोखर सांगू का? पोरीचे काय होईल याची मला भारी काळजी वाटते. तिचे ते हसणे, ते का खरे हसणे होते? ते जगासाठी होते. आईपासून खरे कसे लपवता येईल? तुम्ही उगीच त्या श्रीमंताच्या गळयात मैना अडकवलीत? मैनेच्या गळयात उगीच ते म्हातारे माकड बांधलेत. असो. ब्रह्मदेवाने गाठी बांधल्या होत्या, तसे झाले. आपण माणसे काय करणार? पहा. मैनेच्या गोष्टी निघाल्या तसा हा रडायचा थांबला. जयंताचे रडे थांबवायला एक उपाय आहे. मैना, मैना असे म्हटले की, लबाड एकदम रडायचा थांबतो. राम राम म्हटले की भुते पळतात, तसेच मैनेचे नाव घेताच याचे रडे पळते. इतकी का रे मैनाताई तुला आवडते?'' असे म्हणून सावित्रीबाईंनी जयंताला घट्ट पोटाशी धरिले.
धोंडभटजी काही बोलले नाहीत. त्यांच्याही मनात काही निराळे विचार आले की काय? केली ती गोष्ट वाईट, असा पश्चात्ताप इतक्यातच त्यांना होऊ लागला होता का? परंतु धोंडभटजी पुरुष होते. दुबळया विचारांना आपल्या मनात थारा देणारे ते नव्हते. मैनेचे जे दहा हजार रुपये मिळाले, त्यांचा कसा विनियोग करावयाचा, याचा ते विचार करीत होते. राहते घर चांगले दुमजली बांधायचे, गावातील सुपीक मळावाडी विकत घ्यायची, बागबगीचा करायचा, वगैरे गोष्टी त्यांच्या मनात खेळत होत्या.
धोंडभटजी आता धोंडभटजी राहिले नाहीत. ते धोंडोपंत झाले. त्यांची जणू उत्क्रांति झाली. ते जरा वरच्या वर्गात शिरले. आश्रित न राहता आश्रयदाते झाले. यजमानकृत्ये करणारे न राहता ते यजमान झाले. पुराण सांगणे त्यांनी कधीच बंद केले होते. भिक्षुकीही त्यांनी बंद केली. ते आता सावकारी करू लागले. त्यांच्या वृत्तीत, वागणुकीत, राहणीत फरक पडला.
धोंडोपंतांचे घर पूर्वीप्रमाणे छोटेखानी आता राहिले नव्हते. आता केवढे थोरले घर त्यांनी बांधले होते. दिवाणखाना होता. दिवाणखान्यात सुंदर बैठका घातलेल्या असत. चार हंडया तेथे लावलेल्या होत्या. भिंतीवर चित्रे काढण्यात आली होती. घरी गडीमाणसे होती. एक सुंदरता मळा विकत घेतला होता. गाईगुरे होती. मजा होती.
सायंकाळी बाळ जयंतास घेऊन धोंडोपंत मळयात जात. गडीमाणसे छोटया व मोठया मालकास लवून रामराम करीत. जयंताला गडीमाणसे हिंडवीत. सुंदर फुले त्याला देत. जयंताला फुलांचे अपरंपार वेड होते. तो फुलांशी खेळत बसे. मैनेचा तो भाऊ. तिने जणू त्यालाही फुलांचा नाद लावून ठेवला होता. फुलांच्या संगतीत जयंता वाढत होता.
जयंताला गाईचे दूध असावे, म्हणून एक थोराड छानदारशी गाय मुद्दाम पाळण्यात आली होती. ती गाय फार प्रेमळ व मायाळू होती. जयंता तिला हात लावी. तिच्याजवळ उभा राही. जणू तो तिचाच वत्स होता. त्या गाईचे वासरू अकस्मात मेले. ती दूध कसे देणार? परंतु जयंता समोर दिसला की; तिला पान्हा फुटे. ती हंबरे. जयंताला ती चाटी. जयंता हे तिचे पान्हवणे. तिला दुसरे आंबोण लागत नसे.
बाबा, वासरासारखे मी तोंड लावून दूध प्यायलो तर? चालेल का? होऊ मी खरोखरचे वासरू? होऊ का? सांगा ना! मग तुम्हाला दूध काढायलाच नको.' जयंता म्हणे.
'वेडा आहेस तू. तुला कसे वासराप्रमाणे पिता येईल! गाय लाथ मारील पिता म्हणे.
'मुळीच नाही लाथ मारणार. त्या दिवशी आपल्या घराजवळ तो वासू राहतो ना. त्याला त्याच्या आईने लाकडाने मारले. खरेच, गाय नाही अशी मारीत. आईपेक्षा का गाय चांगली? मला नाही गाय मारणार. लावू तोंड?' जयंता विचारी.
जयंताच्या प्रश्नांस धोंडोपंत कोठवर उत्तरे देणार? ते गप्प बसत किंवा दुसरे काही काम करू लागत. एके दिवशी जयंता पित्याबरोबर नेहमीप्रमाणे मळयात गेला होता. आज सकाळची वेळ होती. मळयाच्या बांधावर जयंत होता. रानफुलांशी खेळत होता. धोंडोपंत दुसरीकडे होते.
'जयंता, ही कसली फुले ते माहीत आहे?' रामा गडयाने विचारले.