दिगंबराला संन्यास म्हणजे थोर वस्तू वाटे. परंतु संन्यास हा केवळ काषाय वस्त्रांतच आहे? त्यागाची परमावधी संसारी लोकांनी थोडी थोडकी का दाखविली आहे! भारतीय स्त्रिया म्हणजे संसारातील जणू संन्यासिनी! संसारात राहून अपार त्याग व ध्येयनिष्ठा दाखविणा-या किती तरी स्त्री-पुरुषांच्या हृदय हलविणा-या कथा दिगंबराला गावोगाव कळत. त्या कथा ऐकून तो मुक बने. संन्यासाचा अभिमान कमी होई. संन्यासी दिगंबर दिव्य संसाराला प्रणाम करी.
हिंडता हिंडता आमचा हो तेजस्वी प्रवासी एका गावी आला. गाव लहान होता. परंतु एके काळी तो गाव वैभवशाली असावा. पडके वाडे ठिकठिकाणी दिसत होते. त्या पडापडीतून पूर्वीचे भाग्य दिसून येत होते. दिगंबर गावात शिरला नाही. गावाच्या बाहेरून तो जात होता. गावाबाहेर नदी होती. नदीच्या तीराने तो चालला. परंतु कोठे जावयाचे होते त्याला? इतक्यात त्याला पलीकडील तीरावर प्रेत जळताना दिसले. गावची स्मशानभूमी का पलीकडील तीरावर होती? नदी ओलांडून तो पलीकडे गेला. हिंडत हिंडत चालला. पुढे त्याला गाईगुरे दिसली. गुराखी खेळत होते. गाई चरत होत्या. काही गाईंचे या धिप्पाड यात्रेकरूकडे लक्ष गेले. हातात दंड असलेला तो दंडधारी पाहून त्या गाई टवकारू लागल्या. हा कोठून आला गुराखी? हा अनोळखी गुराखी होता. याच्या कोठे आहेत गाई? इंद्रियांच्या गाई सांभाळणारा हा गुराखी होता. मनाचे ओढाळ गुरू इकडेतिकडे जाऊ नये, म्हणून त्याने हातात दंड घेतला होता. गाईंनो, भिऊ नका. गुराखी तुम्हांला इजा करणार नाही.
''काय रे मुलांनो, या नदीकाठी त्या समाध्या कोठेशा आहेत?'' त्याने गुराख्यांस प्रश्न केला.
''कसल्या समाध्या?'' एका गुराख्याने विचारले.
''अरे, त्या तीन समाध्या आहेत ना? सतीचे सुंदर वृंदावन आहे, तुम्हांला माहीत नाही?'' दिगंबर आश्चर्याने म्हणाला.
''सतीचे वृंदावन होय? जा. असेच जा तीरातीराने. पुढे थोडी झाली लागेल. त्या झाडीजवळच तीन चबुतरे आहेत. आम्ही कोणी तिकडे जात नाही. आम्हांला भीती वाटते. परंतु आम्ही दुरून नमस्कार करितो. कोणी शाहीर आला तर त्यांचा पोवाडा म्हणतो. तो पोवाडा मात्र सारे ऐकतात व रडतात.'' एक धीट मुलगा म्हणाला.
''ते चबुतरे का लहान आहेत?'' दिगंबराने विचारले.
''पूर्वी छान होत्या तेथे इमारती. नदीला एकदा महापूर आला व त्या वाहून गेल्या. आता मोडक्यातोडक्या आहेत त्या.'' तो मुलगा म्हणाला.
''तेथे यात्रा वगैरे नाही का भरत?'' दिगंबराने प्रश्न केला.
''पुष्कळ वर्षांपूर्वी भरत असे. परंतु आता काही नाही. आता सारे रान माजले आहे तेथे. पूर्वी छानशी बागसुध्दा होती, असे म्हणतात. परंतु आता जिकडेतिकडे काटे आहेत. आम्ही कोणी तिकडे जात नाही. सापांची भवने आहेत तेथे. कधी वाघ तेथे येतात व नदीचे पाणी पिऊन जातात. तुम्ही जपून जा. तेथे जायला सारे भितात.'' तो गुराखी म्हणाला.