'कसली रे रामा? कशी चिमुकली आहेत! छान आहेत?' जयंत म्हणाला.
'या फुलांची एक गोष्ट आहे.'
'सांग मला. सांग गोष्ट.'
'या फुलांना कृष्णवर्णाची फुले म्हणतात. पाऊस संपत आला म्हणजे ही फुलतात. दवाचे थेंब टपटप पडू लागतात, तेव्हा ही फुलतात. ही फुले नाहीत देवाच्या डोळयातील हे पाणी आहे. आपल्या या जगात पुष्कळ लोक दु:खी असतात. विशेषत: बायका फार दु:खी असतात, लहान मुलींची लग्ने होतात. मग त्या सासरी जातात. तेथे त्यांचा छळ होतो. त्या रडतात. परंतु आपले रडे त्या कोणाला दाखवीत नाहीत. त्यांचे रडणे देवाला माहीत असते. रात्र झाली म्हणजे या गरीब मुलींसाठी देवसुध्दा रडतो. म्हणतो अशी कशी दुष्ट माणसे! देवाच्या डोळयांतील पाणी हिरव्या गवतावर पडते. मग ही फुले होतात. अशी आहे ही गोष्ट.' रामा म्हणाला.
'कोणी सांगितली तुला ही गोष्ट?' जयंताने विचारले.
'माझ्या म्हातारीने.' रामाने सांगितले.
इतक्यात धोंडोपंत तेथे आले. भाजीवगैरे घेऊन आले.
'काय रे जयंता, जायचे ना घरी! का येथे बांधावरच बसतोस? मी जाऊ घरी?' त्यांनी विचारले.
'बाबा, ही फुले पहा. कशी आहेत निळीनिळी. कृष्णाचा रंग असाच होता ना? माझा का नाही असा? मी आपला गोरा गोरा. मैनाताईसुध्दा गोरीगोरीच आहे. होय ना? बाबा मैनाताई कधी येईल हो? ती सासरी रडते का हो? रामा म्हणाला सासरी गेलेल्या मुली रडतात. मग देवसुध्दा बसून रडतो. देवाच्या डोळयातून जे पाणी पडते, त्याची ही फुले होतात. खरे का हो हे, बाबा? देव मैनाताईसाठीसुध्दा रडतो का? मीसुध्दा रडतो माझ्या मैनाताईसाठी. मला तिची आठवण येते. मैनाताई आली म्हणजे ही फुले मी तिला दाखवीन व तिला विचारीन की, तू सासरी रडतेस का?' जयंता फुलांना कुरवाळीत म्हणाला.
'जयंता, तू लहान आहेस अजून. इतक्या लहान वयात असे बोलायला तुला कोणी शिकविले? बाळ, तू हस, खेळ, हे तुझे हसण्याखेळण्याचे दिवस. रडण्याच्या गोष्टी कशाला?' असे म्हणून धोंडोपंतांनी जयंताला जवळ घेतले.
'बाबा, आई म्हणते की, मी लहान होतो, तेव्हा फार रडत असे. मैनाताईने घेतले की, माझे रडे थांबत असे. खरे का हो बाबा? कधी येईल मैनाताई? ती का येत नाही? तुम्ही तिला का नाही आणीत? तुम्हाला ती आवडत नाही का? सासरी ती रडत असेल. त्या गोष्टीतल्या मुलींप्रमाणे रडत असेल.' जयंत म्हणाला.
'रामा तू जयंताला असल्या वेडयावेडया गोष्टी सांगत नको जाऊस. उगीच काही तरी मग तो विचारीत सुटतो. लहान मुलांना काऊचिऊच्या गोष्टी सांगाव्या; कुत्र्यामांजरांच्या, सशालांडग्याच्या गोष्टी सांगाव्या.' धोंडोपंत जरा रागाने म्हणाले.
'मी काही आता लहान नाही, बाबा, आई म्हणते तुझी आता मुंज करू. मुंजीला मैनाताईला बोलावू. मी मोठा झालो आहे. मला नकोत काऊचिऊच्या गोष्टी. मला माणसांच्या हव्यात गोष्टी. त्या कावळयाच्या गोष्टीत त्याचे घर आपले नेहमी शेणाचे. ते पावसात वाहून जायचे. कावळयाचे घर कोठे हो आहे, बाबा? आपले घर जाईल का हो वाहून? केवढाले खांब आपल्या घराचे. माझ्या हातांत मावतसुध्दा नाहीत. मोठाले खांब लागतात डोक्याला नाही?' जयंत बोलत होता.
'किती रे बोलशील, किती विचारशील!' धोंडोपंत त्याचा मुका घेऊन म्हणाले.
'बाबा, मला माणसांच्या गोष्टी सांगा. रामाला सांगू दे. रामा सुरेख सांगतो गोष्टी. मैनाताईच्या गोष्टी सांगतो. बाबा, गोपाळ हो कोण होता? मैनाताईला तो आवडत असे. तो देवळात राहात असे. नदीच्या तिकडे देऊळ आहे, त्यात रहात असे. रामा सांगतो सारे. गोपाळ का आमचा भाऊ होता? तो गोरा गोरा होता का हो? हे काय तुम्ही सांगतच नाही. सांगा ना बाबा. तुम्ही का राम राम म्हणता? मीही म्हणू राम राम? मैनाताईसुध्दा जप करीत असे. होय ना? मी सुध्दा करीन, देवळात जाऊन बसेन.' असे म्हणून जयंता थांबला.
जयंता वाढत होता. मनाने, बुध्दीने, शरीराने वाढत होता. त्याच्या फार लक्षात रहायचे. त्यांच्या बोलण्याचे सर्वांना आश्चर्य वाटे. मैना ब्रह्मवादिनी होणार होती. जयंता का ब्रह्मवेत्ता होणार?