हळूहळू मुरलीधराच्या मंदिरातील पुराणास लोक फारसे जातनासे झाले. तिसरा प्रहर होताच लोक नदीपलीकडील त्या शिवालयाकडे वळत. रानातील हे पडके शिवालय गजबजू लागले. तो तरुण जणू नवा देव बनला. इतके दिवस शिवालय तेथे का नव्हते? होते. तेथे ती पिंडी होती. तो नंदी होता, परंतु कोणी येत नव्हते. क्वचित कधी कुत्री तेथे येत, क्वचित पाखरे येत, परंतु आता नवीन चालताबोलता देव आला होता. सुंदर, उदार, प्रशांत, धीरगंभीर असा हा नवीन ज्ञानदेव आला. त्याला पहायला, त्याचे शब्द ऐकायला, त्याला प्रणाम करायला जेव्हा जेव्हा वेळ मिळे, तेव्हा तेव्हा लोक येत. गावातील मुलेही येत. त्या मुलांना तो तरुण पुराणातील गोष्टी सांगे, इतर गंमतीच्या गोष्टी सांगे. मोठया माणसांशी गंभीरपणे बोलणारा तो तरुण त्या मुलांना पोटभर हासवी व स्वत:ही हसे. ज्ञानाजवळ विनोद असणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. बोधाजवळ विनोद फार खुलून दिसतो. खरे ज्ञान प्रसन्न असते. ते हसरे असते. आनंदाचे किरण आसमंतात फेकणारे असते.
बरेच दिवसांनी मैना परत आली. आजोळाहून परत आली. ती कृश होऊन आली होती. तिच्या तोंडावरची खेळकर प्रसन्नता नष्ट झाली होती. ती आपले गोड गाणे विसरून आली होती, गोड हसणे विसरून आली होती. मैनेला पाहून तिच्या आईबापांस वाईट वाटले.
''मैने, तू आजारी होतीस का?'' आईने विचारले.
''आजारी पडण्याचे माझे भाग्य नाही. रोग माझ्याजवळून पळतात. मी बरी होते.'' ती म्हणाली.
''परंतु वाळलीस किती तू?''
''विनयाने मनुष्य वाळतो. आई, आजोळी मी विनय शिकले. घरातच बसून रहायला शिकले. फार हसू नये, फार बोलू नये, हे शिकले. मनाचा कोंडमारा करायला शिकले. मनाचा कोंडमारा झाला की, शरीराचाही होतोच. मन वळले की शरीरही वाळते.''
''मैने, तुला कोणते दु:ख आहे? खरे सांग.''
''मला काहीएक समजत नाही.''
''तुझे लौकरच लग्न करून देऊ.''
''जे काही कराल, ते स्वीकारले पाहिजे.''
''मैने असे दु:खाने का बोलतेस?''
''मला सुख नाही, दु:ख नाही. मैनेला जगणे नाही, मरणे नाही. मैना ब्रह्मवादिनी आहे.''
''वेड लागले तुला. जा पुन्हा हास, खेळ. गावातील फुले जमव. मुरलीधराच्या मूर्तीला सुंदर माळा कर. माझी मैना फुलराणी आहे.''
मैनेला कळले की त्या पडक्या शिवालयात कोणी योगी आला आहे. तरुण, नयनमनोहर योगी. एके दिवशी सायंकाळी मैनाही त्या शिवालयाकडे निघाली. लोकही जात होते. एका शिलाखंडावर बसून तो तरुण उपनिषदांचा भावार्थ सांगत होता. येणारे प्रणाम करून दूर बसत होते. मैनाही प्रणाम करून दूर बसली. प्रवचन संपले. लोक परत जाऊ लागले. मैना तेथेच घुटमळत राहिली. शिवाला ती प्रदक्षिणा घालू लागली. किती घालणार प्रदक्षिणा? मैने, थकशील, पुरे कर.
''बाहेर काळोख पडला, आता तुम्ही माघा-या जा.'' तो तरुण योगी म्हणाला.
''मी आजपर्यंत काळोखात होते. आता उजेड येत आहे. जाते मी.'' ती म्हणाली.