‘आमचा चारु पण खाईल. त्यानेच चिरून आणली; परंतु खाल्ली नसतील.

‘चारु, अरे चारु...’ जहागीरदारांनी हाक मारली.

‘काय बाबा?’

‘बस की यांच्याबरोबर. खा फळे या आताच आल्या. बस.’

‘अरे असा लाजतोस काय? आमचा चारु सा-या मुलखाचा लाजरा आहे.’

‘परंतु आमची चित्रा सा-या मुलखाची धीट. वाटेल त्याच्याजवळ बोलेल. मैत्री करील. ते फौजदार होते ना महंमदसाहेब, त्यांच्याकडेही चित्रा जायची. त्यांची नात फातमा ती हिची मैत्रीण.’

‘मुसलमान का सारेच वाईट असतात?’ चित्राने विचारले.

‘इतर देशांतील चांगले असतील. या देशातील तरी वाईट आहेत.’ जहागीरदार म्हणाले.

‘या देशातील मुसलमान हिंदूतून बाटून झालेले ना? जर ते वाईट असतील तर मुळात हिंदूच वाईट असे नाही का?’ चित्राने विचारले.

‘वा, चांगलाच वाद करते तुमची चित्रा.’ जहागीरदार म्हणाले.

‘फार चुरुचुरु बोलते ती. बॅरिस्टर हवा नवरा तिला. इतर नवरे नाही उपयोगी.’ बळवंतराव हसून म्हणाले.

‘आमचा चारु अगदी मुखस्तंभ!’ जहागीरदार जरा ओशाळून म्हणाले.

‘अहो, मुखस्तंभ नाहीत काही ते. मघा तिकडे माझ्याजवळ किती तरी वेळ ते बोलत होते. माझे नाव-गाव विचारीत होते. खरे की नाही हो?’
चित्राने हसून विचारले.

‘परंतु आधी तुम्हीच विचारले.’ चारु हसून म्हणाला.

इतक्यात गड्याने येऊन स्वयंपाक तयार आहे असे सांगितले बोलणे चालले असता फळांचा फन्ना केव्हाच उडवण्यात आला होता.

‘चित्रा, बसायचे का जेवायला? बसूच, लौकर परत जाऊ.’

‘लौकर का बाबा? संध्याकाळ झाली म्हणजे निघू. उन्हातून कशाला?’

‘खरेच, घाई कशाला रावसाहेब?’ जहागीरदार म्हणाले.

‘बरे बघू मग. आता आधी जेवून घेऊ.’ रावसाहेब म्हणाले.

पाटपाणी तयार होते बळवंतराव, चित्रा, जहागीरदारसाहेब बसले पानांवरून

‘आणि तुमचे चारु नाही का बसत?’ चित्राने विचारले.

‘तो वाढायला थांबेल.’ जहागीरदार म्हणाले.

‘अय्या, बायकांचे काम का ते करणार? मग मीच थांबत्ये. मी वाढत्ये. मला भूकसुद्धा नाही लागली. आत्ता तर फळे खाल्ली वाढू का मी?’ चित्राने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel