‘तुला तरी कोठे माहीत आहे? दळले आहेस का घरी कधी?’
दोघे दळत होती. चित्रा आनंदली होती.
‘चित्रा, ओवी म्हण की. बायका ओव्या म्हणतात.’
‘मला नाही येत.’
‘एकदोन तरी येत असतील हो. म्हण.’
आणि चित्राने ओवी म्हटली,
दळण दोघे दळू, हात दोघांचे लागती
चित्रा नि चारु यांची, एकमेकांवरी प्रीती।।
एकमेकांवरी प्रीती, वाणीने मी वर्णू किती
एकमेकांच्या हृदयी, एकमेकांची वसती।।
चारूराया चित्रा शोभे, जशी चंद्राला रोहिणी
पतीला ती निज प्रेमे, घाली सदैव मोहिनी।।
अशा ओव्या चालल्या होत्या. तो सासूबाई आल्या.
‘झालं का ग दळण? आणि हे काय? चारु, तू का दळत बसलास? अरे, तुला लाज कशी नाही? इतका काय बाईलवेडा! साहेब नि मड्डम जणू! दळू दे तिला. काही मरत नाही पसाभर दळून. ऊठ. सारा गाव तोंडात शेण घालील. गडीमाणसे काय म्हणतील? आणि हिने तुला बोलावले असेल. लाज नाही मेलीला. केव्हाचे दळायला दिले आहे. तरी सांगितले होते तीनतीनदा बजावून की, तो शेतावरून यायच्या आधी आटप म्हणून. ऊठ हो.’
‘आई, अग दळले जरा म्हणून काय झाले? व्यायाम होतो.’
‘इतके दिवस नाही कधी दळायला आलास तो. आईला हात लावला होतास का दळताना कधी? बायकोवर माया. काल आली नाही तर तिच्याबरोबर दळायला लागला. आईने जन्मभर खस्ता खाल्ल्या त्याचे काहीच नाही.’
‘चारू, जा हो तू.’ हळूच चित्रा दु:खाने म्हणाली. चारू उठून गेला. चित्रा दळत बसली. तिने कसेबसे दळण संपवले. आज तिच्या हाताला खरेच फोड आले. पुन्हा दुपारी भांडी घासायची. फोड झोंबत. चित्राला रडू येई.