चारू गेला. चित्राची आता दीनवाणी स्थिती झाली. जहागीरदारही चार दिवस निर्मळपूरलाच औषधासाठी जाऊन राहिले. घरी केवळ सासूचे राज्य. चित्राचे हाल आता कुत्रा खाईना. तिला पहाटे सासू उठवी. खटाळभर भांडी घासायला लावी. शिव्या येता जाता आहेतच.
रात्री बारा वाजता थकलीभागलेली चित्रा आपल्या शयनमंदिरात जाई; परंतु एके दिवशी सासू म्हणाली,
‘वर नाही निजायचे! खालीच स्वयंपाकघरात झोपत जा. गाद्या हव्यात लोळायला. तो येईपर्यंत नाही वर झोपायचे. समजलीस? त्या खोलीला मी कुलुपच लावत्ये.’ आणि खरेच त्या सासूने चित्राच्या खोलीला कुलुप लावले. क्षणभर जाऊन बसायला, रडायला जागाही नाही. स्वयंपाकघरातच तिला निजावे लागे. तेथे ओल असे. डास असत. निजायला फटकूर मिळे. पांघरायलाही धड नाही. अरेरे, चित्रा. काय ही तुझी दशा!
परंतु सासरा निर्मळपूरहून परत आला.
‘चित्रा, तुझ्या खोलीला कुलुपसे?’
‘सासूबाई म्हणतात खालीच निजत जा.’
‘दुष्ट आहे ती. मी सांगतो हो तिला.’
आणि सास-याने सांगितले.
‘काही नको वर निजायला! मला या मुलीचा काडीचा भरंवसा नाही. घरात तुम्ही नव्हतात. चारू नाही. ही आपली दिवसासुद्धा वर जाऊन गादीवर लोळायची. लाजच नाही मेलीला. म्हणून कुलूपच लावले. वर गेलीस तर तंगडी तोडीन म्हटले. खाली अस माझ्या डोळ्यांसमोर, उद्या काही केलेन् नि तोंडाला काळे फासलेन् तर करता काय? यांचे होतील खेळ, आपली मान खाली. तुम्ही म्हणत असाल तर उघडते कुलूप. लोळे की नाही! माझे काय जाते? आणखी म्हणावं चार गाद्या घाल.’
चित्राचे मंदिर उघडले. त्या दिवशी रात्री चारूचा फोटो जवळ घेऊन ती रडली.
‘चारू, ये रे लौकर परत. तू येईपर्यंत मी जिवंत तरी राहीन की नाही कोणास ठाऊक! परंतु तुझ्यासाठी मला जगले पाहिजे. मी गेल्यावर तू रडशील, दु:खी होशील, जगेन हो. तुझ्यासाठी जगेन चारू, तुझ्याच एक मला आधार आहे हो.’
असे त्या फोटोला हृदयाशी धरून ती म्हणत होती.
चित्रा अशक्त झाली. आजा-यासारखी दिसू लागली; परंतु चारू आला. चित्राची दशा पाहून त्याला वाईट वाटले.
‘चित्रा, आईने तुझे हाल केले. होय ना?’