पैसे पुरे पडत ना, तेव्हा दिलावर हा बायकांचा धंदा करू लागला. पळवून आणलेल्या बायका तो विकत घेई व पुन्हा आणखी कोणाला नफ्याने विकी. बरा चालला होता धंदा.
फातमाला या गोष्टी फारशा माहीत नव्हत्या. तिचे दिलावरवर प्रेम होते. दिलावर तसा स्वभावाने दुष्ट नव्हता; परंतु चैनीची चटक त्याला लागली होती आणि पैशांसाठी तो हे प्रकार करू लागला.
त्याने एका खोलीत चित्राला ठेवले होते. चित्राच्या सेवेला त्याने एक मोलकरीण ठेवली होती. तिची तो काळजी घेई. रोज तिच्याकडे जाई.
‘सोडा मला. मी पाया पडते. माझा पती वाट पाहात असेल. आईबाप रडत असतील. दु:खाने वेडे होतील दया करा. तुमचे नाव रहीम ना? रहीम म्हणजे दया करणारा ना? रहीम हे नाव लहानपणापासून मला आवडे.’
‘तुम्हाला का मुसलमानी नावे आवडतात?’
‘चांगली नावे कोणाला आवडणार नाहीत? आणि माझी मुसलमान मैत्रीण होती. मी तिच्याकडे जात असे. किती माझ्यावर प्रेम. माझ्याजवळून तिने रामायणाने नेले होते. तिने मला ‘इस्लामी संत’ हे पुस्तक दिले होते. मुसलमान वाईट आहेत असे कोणी म्हटले, तर मी ते चांगले आहेत असे म्हणे आणि फातमा, तिचे आजोबा महंमदसाहेब यांचे उदाहरण मी देत असे; परंतु आज निराळाच अनुभव येत आहे. मुसलमानांचे नाव बद्दू नका करू. उज्ज्वल करा. मला बहीण माना व सोडा.’
‘तुमच्या मैत्रिणीचे नाव काय फातमा?’
‘हो.’
‘ती तुम्हाला पत्र पाठवी?’
‘एकदोनदा आले. तिच्या नव-याचे नाव दिलावर. तोही स्वभावाने उदार व प्रेमळ आहे असे तिने लिहिले होते; परंतु पुढे बरेच दिवसांत तिचे पत्र नाही. तुम्ही ओळखता माझी फातमा?’
‘जगात लाखो फातमा आहेत.’
‘परंतु माझ्या फातमासारखी प्रेमळ कोण असेल?’
‘रहीम म्हणजेच दिलावर निघून गेला. कुलुप लावून निघून गेला. तो घरी आला. फातमा काही विणीत बसली होती.