‘पडल्यात तर मी आहे ना?’

‘पडल्यावर तुमचा काय उपयोग?’

‘लहान लहान मुलेही खूप उंच नेतात.’

चित्रा पुन्हा चढली झोक्यावर, ती झोका खूप उंच नेऊ लागली.

‘शाबास, शाबास! चारु म्हणाला.

तिने आणखी वर नेला; परंतु ती लटपटली, तिला का घेरी आली? तिचा हात सुटला. चित्रा खाली पडली. ती ओरडली. तिकडे गडी-माणसे होती, ती धावत आली. चित्राला बरेच लागले. कपाळाला एक दगड लागला. रक्ताची धार लागली. कोपर बरेच खरचटले. बळवंतराव, ते जहागीरदार, सारे तेथे गजबजून आले. एका गड्याने कसला तरी पाला आणला, भांबुरडीचा पाला. हातावर चोळून तो त्याने चित्राच्या कपाळावर बांधला. रक्त थांबले. ‘चित्रा, चालवते का? ऊठ.’ पिता म्हणाला. हळुहळु ती बंगलीत आली. केस तिने एका हाताने साफ केले. कोपर दुखत होते. तिला रडू आले.

‘हे काय! रडतेसशी? अग उंदीर पळाला! इतके काही नसेल हो लागले. घरी जायचे का?’ बापाने विचारले.

‘आता मी जरा पडत्ये.’

‘पड तर मग.’

चित्रा झोपली. थोड्या वेळात खरोखरच तिला झोप लागली. बळवंतराव, जहागीरदार, चारू पत्ते खेळत होते. खेळता खेळता बळवंतराव एकदम मोठ्याने  हसले. चित्रा जागी झाली, ती उठली.

‘नीज की जरा.’ बाप प्रेमाने म्हणाला.

‘तुम्ही मात्र खेळणार नि मी नीजू वाटते?’

‘तुला लागले ना आहे?’

‘तुम्हीच ना म्हणालेत उंदीर पळाला? काही नाही लागले, मी येते खेळायला. पाच पानी हुकुमाचे खेळू. कोण कोण भिडू?’

‘आम्ही म्हातारे एका बाजूला, तुम्ही दोघे एका बाजूला.’

‘चालेल का हो तुम्हाला?’ चित्राने चारुला विचारले.

‘मोठ्यांचे ऐकलेच पाहिजे.’ तो हसून म्हणाला. खेळ सुरू झाला. चित्रा व चारु यांच्याकडे सारखा डाव यावयाचा. चित्राला हसू आवरेना.

‘बाबा, तुम्हाला काही कसा येत नाही डाव?’

‘अग ज्यांचे लग्न व्हायचे असते ना, त्यांच्याकडे डाव येतो.’ बळवंतराव म्हणाले.

‘यांचे व्हायचे आहे वाटते लग्न?’ तिने हसून विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel