इतक्यात चारु तेथे आला.
‘आमची चित्रा सांभाळा हो.’ सीताबाई म्हणाल्या.
‘मला सांभाळण्यापेक्षा तिला अधिक सांभाळीन. खरे ना चित्रा?’
‘खरे हो.’
‘चित्रा, चल आपण स्टेशनवर पुढे जाऊ, तिकिटे काढू. येतेस?’
‘चला जाऊ.’
दोघे स्टेशनवर गेली. त्यांनी तिकिटे काढली. सामान आले. काही आधीच पाठवून दिले होते मालगाडीने. हे सारे बरोबर न्यायचे होते. सारी मंडळी आली. गावातीलही काही मंडळी आली होती. शिपाई आले होते. बळवंतराव लोकप्रिय होते. निरोप द्यायला शेवटी शेवटी बरीच गर्दी झाली. कोणी माळाही घातल्या. कोणी भेटी आयत्या वेळेस आणल्या. आता थोडा होता वेळ. श्यामू, रामू, दामू बसले गाडीत. सीताबाई बसल्या. बळवंतरावही बसले.
चित्रा व चारु खाली उभी होती. शिट्टी झाली.
‘जपा हो.’ बळवंतराव म्हणाले.
‘ताई, चाललो.’ भावंडे म्हणाली.
‘जप हो.’ बळवंतराव म्हणाले.
चित्राला बोलावत नव्हते. सुटली गाडी. चित्रा व चारु परतली. गाडी घेऊन ती आली होती. बसली दोघे घोड्याच्या गाडीत व निघाली. गडी हाकलीत होता. चारु व चित्रा आत होती. चित्राच्या डोळ्यांत राहून राहून पाणी येत होते.
‘चित्रा, उगी, रडू नको. मी आहे ना?’
‘होय, हो चारु; परंतु वाईट वाटते हो.’
‘वाईट वाटायचेच.’
गाडी घरी आली नाही तो सासूची गर्जना सुरू!
‘म्हटलं येता की नाही घरी की, राजाराणी जातात पळून? किती हा उशीर! चारु, तू अगदी नंदीबैल होणार की काय? ती नाचवील तसा तू नाचतोस. सिनेमा पाहून आला असाल? उगीच नाही इतका उशीर झाला. शहरातल्या सवयी. सिनेमे हवेत आणि सिनेमातल्यासारखे उद्या करालसुद्धा.’