‘अमीना. अलीकडे तू फारशी बाहेर जातेस? आणखी कोणाकडे फावल्या वेळात काम करतेस वाटते?’
‘फातमाबिबी, तुमच्या पायाशी एक अर्जी आहे.’
‘काय आहे? पैसे हवे असतील. कोणी आजारी का आहे? मुले बरी आहेत ना?’
‘सारी खुशाल. गुप्त गोष्ट आहे. दिलावरसाहेबांनी एक वाईट गोष्ट केली आहे.’
‘कोणती?’
‘त्यांनी कोणी एक हिंहू मुलगी पळवून आणली आहे. ती सारखी ऱडत असते. तुम्ही तिचे संकट दूर करू शकाल. फार गोड व गरीब मुलगी आहे, मला वाईट वाटते; परंतु मी काय करणार? म्हटलं, तुमच्या कानांवर घालीन.’
‘किती दिवस झाले?’
‘बरेच दिवस झाले.’
‘काही वेडेवाकडे झाले का?’
‘दिलावर तसे पाक आदमी आहेत; परंतु ते या मुलीला कोणाला तरी विकणार आहेत, त्यांची तिच्यावर पापदृष्टी नाही.’
‘पैशासाठी सारे! दिलावर, काय चालवलेस हे! बरे, अमीना, आता येऊ का मी तुझ्याबरोबर? दिलावर तेथे केव्हा येतो?’
‘आता आज येणार नाहीत.’
‘तर मग मी जरा अंधार पडला म्हणजे तुझ्याबरोबर येईन आणि हे बघ, आपल्या या घरात ती एक रिकामी खोली आहे ना? ती खोली झाडून तेथे खाट, गादी ठेव. समजले? काही बोलायचे नाही हं.’
सायंकाळ झाली. अमीना व फातमा दोघी निघाल्या. कुलूप उघडले. फातमा आत आली व अमीना बाहेरच उभी होती.
‘कोण फातमा?’
‘कोण चित्रा?’
‘होय फातमा, माझी फातमा, मला वाचव, वाचव.’