‘आपण यांना इस्पितळात ठेवले तर? तेथे वेड जाते. काही उपाय करतात. आपण येथून सारीच जाऊ. तिकडेच राहू. ठाण्याला म्हणतात, आहे असा दवाखाना. मी येऊ का चौकशी करून?’
‘भोजू, तू सांगशील तसे तुझ्यावर त्यांचा लोभ होता. नाथांकडे श्रीखंड्या तसा जणू तू आमच्याकडे आलास. तुझाच आता आधार आहे हो. माहेरी तरी माझे सख्खे कोण आहे? एकदा येऊन गेले. पुन्हा कोणी आले का? जाऊ दे. आपले नशीब नि आपण; परंतु त्या इस्पितळात खर्च द्यावा लागेल. मुलांच्या विद्या! कसे करायचे! ह्या पाटल्या विकाव्या. ही कुडी विकावी.’
‘आई, तुम्ही काळजी नका करू. एवढ्यात अंगावरचे विकू नका. शेवटी आलीच वेळ तर विकू. मी ठाण्यास चौकशी करून येतो. येतो जाऊन.’
आणि भोजू गेला. ठाण्यास येऊन त्याने सर्व चौकशी केली. त्याने बळवंतरावांसंबंधी सारी हकीगत सांगितली. डॉक्टर म्हणाले, ‘घेऊन या. गुण येईल.’ भोजूने तेथे राहायला एक चांगले घरही पाहिले. नौपाड्याच्या दत्तमंदिरात खोल्या रिकाम्या होत्या. तेथून इस्पितळही जवळ होते. सीताबाईंना देवळाचाही आधार होईल. ते दत्तमंदीर सुंदर होते. केवढे थोरले आवार. बाग होती. तेथे मोफत वाचनालय होते. मोफत दवाखाना होता. रम्य शांत ठिकाण. मुलांना शाळाही फार लांब नव्हती. तेथे सारी व्यवस्था करून भोजू आपल्या गावी गेला. त्याने आपले घरदार, शेतीवाडी विकली आणि जे काय हजारभर रूपये मिळाले ते तो घेऊन आला. आपल्या नावाने पोस्टात त्याने ते ठेवले.
भोजू घरी आला. त्याने सीताबाईंस सारे सांगितले. त्या दत्तमंदीराचे त्याने रम्य वर्णन केले. सायंकाळी सुंदर आरती होते. नगारा वाजतो. टाळ, तास वाजतात. पुजारी भक्तिभावाने गोड गाणी म्हणतो. ते इस्पितळही जवळच. वेड्यांचे डॉक्टर फार सज्जन आहेत सारे त्याने सांगितले.
सीताबाईंनी जायचे ठरवले.
‘येता ना ठाण्यास?’ भोजूने बळवंतरावांस विचारले.
‘ठाण्यास?’
‘हो.’
‘तेथे कशाला? तेथे तुरूंग आहे. वेड्यांचे इस्पितळ आहे. मला का कलेक्टर तुरूंगात घालीत आहे! का वेड्यांच्या इस्पितळात पाठवीत आहे?’
‘तेथे चित्रा आहे. तेथे चित्राताई भेटेल.’
‘खरेच का? तपास लागला तिचा?’
‘असे कळले आहे.’