डिजिटल साहित्य आणि ईपुस्तके
जगण्याच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा जरी त्याच असल्या तरी त्यांचे स्वरूप त्यांच्याबाबतची ‘चव’ ‘आवडनिवड’ सारं काही अमुलाग्रपणे बदलत असते. विस्तृत असे हे जग सध्या कधी नव्हे इतके जवळ आले आहे. आणि जगातल्या कानाकोपऱ्यात पोचलेला मनुष्य प्राणी कधीही नव्हता इतका ‘जोडला’ गेला आहे. सारं काही ‘लाईव्ह’, ‘पोस्ट’ आणि ‘शेअर’ होऊ लागलं आहे. याचे पडसाद नुसत्या शहरांपर्यंत मर्यादित न राहता ग्रामीण व दुर्गम समजल्या जाणाऱ्या खेड्यापाड्यात देखील अनुभवता येतात.
गुंफेत काढलेली चित्रे असोत किंवा सध्याचे सेल्फी. त्यांचा मूळ गाभा ‘व्यक्त होणे’ हाच होता आणि आहे. ‘व्यक्त होण्यासाठी’ माणसाने चित्रे काढली, मूर्तीकला विकसित केली, शब्दांच्या ब्रम्हांडाची निर्मिती केली, लेखनकला आत्मसात केली, पुस्तके लिहिली, चित्रपट निर्मिती केली अशा असंख्य मार्गांचा अवलंब केला. माध्यम जरी बदलेले असले तरी व्यक्त होण्याच्या हा गरजेपोटीच नवनवीन क्षेत्रे व उद्योग जन्माला येत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘डिजिटल साहित्य’.
स्टेटस, पोस्ट, ट्विट, ब्लॉग वगैरे मार्गांनी मानवाच्या इतिहासात कधीही घडले नाही इतके साहित्य रोज निर्माण होत आहे. समाजमाध्यमांवर लोक वाचत आहेत. लिहित आहेत. ‘शेअर’ करत आहेत. मुळात ‘व्यक्त होत आहेत’. या लिखाणाला ‘साहित्य’ मानावे इतके हे प्रभावी व प्रगल्भ होत आहे. खूप उत्तम प्रतीचे साहित्य आणि ते देखील ‘प्रमाण भाषा’, ‘बोली भाषा’ किंवा तस्तम बंधनांच्याही पलीकडे जाऊन निर्माण होते आहे. ‘अर्वाच्य’ मानल्या गेलेल्या विषयांवर उघडपणे लिहिले जाते आहे आणि त्याला अनेकांचा प्रोत्साहन देणारा प्रतिसादही मिळतो आहे. लेखकांची एक वेगळी आणि प्रंचड संख्या असणारी तंत्रज्ञानकुशल नवीन पिढी तयार झाली आहे. त्यांचा वाचकवर्ग जगभर विखुरला गेला आहे. या वाचकांच्या गरजा डिजिटल आहेत.
उत्तम लिखाण वाचण्यासाठी ‘ईपुस्तके’ एक आकर्षक, स्वस्त व प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहेत. छापील पुस्तकांच्या मर्यादांना तोडून, प्रकाशकांच्या अभेद्य गड किल्यांना झुगारत स्वतःच्या लेखनकौशल्यावर जगभरातून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारावर लेखक स्वतःच ‘ईपुस्तक’ निर्मिती करू लागले आहेत.
पण इथे एक मेख आहे. गेल्या दशकात ‘ईपुस्तक’ म्हणजे ‘PDF फाईल’ असा काहीसा अपरिपक्व विचार इतका दृढ झाला आहे की ईपुस्ताकांची एक मोठी बाजारपेठ आपल्याकडे विकसित होता होता राहून गेली. साहित्याला बाजारपेठ वगैरे मानने लोकांना पटत नसेल कदाचित. पण हेच लोक साहित्य छापून ते ‘विकायला’ काढतात ते देखील ‘बाजारातच’ की. असो, आपण या वादात पडण्याचे कारण नाही. मुद्दा हा आहे की कोणत्याही क्षेत्रात ‘अर्थकारणावर आधारित प्रणाली’ विकसित करणे हे महत्वाचे असते. प्रत्येक क्षेत्राच्या काही गरजा असतातच. डिजिटल साहित्य विकसित झाले ते त्यामागील चातुर्याने निर्माण केलेल्या ‘अर्थकारणा’मुळे.
डिजिटल माध्यमांवर वाचन करणाऱ्या व जगभर उपलब्ध असणाऱ्या वाचकांची ‘मागणी’ प्रत्येक क्षणाला वाढते आहे. करोडो लोक स्मार्टफोनच्या माध्यमाने या प्रवाहात येत आहेत. त्यांची वाचनाची ‘मागणी’ सर्वाधिक प्रभावीपणे समाजमाध्यमांद्वारे पूर्ण होते आहे. पण त्याच वेळी समाज माध्यमांचे व ‘सतत ऑनलाईन’ असण्याचे तोटे देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत. म्हणून व्यस्त दिनचर्येत आपला वाचनाची आवड/ व्यासंग/ भूख शांत करण्यासाठी हा वाचक वर्ग ईपुस्तकांकडे वळतो आहे. त्यांच्यासमोर रांगत असणारी पिढी अधिक जास्त डिजिटल वाचन करणार आहे याची जाणीव त्यांना आहे. सोबतच आपल्या या येणाऱ्या पिढीने समाज माध्यमांवर वेळ घालवण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर जास्त लाभदायक प्रकारे करावा असे मानणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सोबतच आपल्या लेखन कौशल्याने जागतिक स्तरावर प्रसिद्धी, कीर्ती व आर्थिक लाभ मिळवण्यास इच्छुक लेखकवर्ग देखील तयार होतो आहे.
जगभर ईपुस्तके यशस्वी होत आहेत. त्यांचे अत्याधुनिक स्वरुप EPUB हे आहे. ‘PDF’ ला मागे टाकून EPUB प्रणाली कैक पटींनी विकसित झाली आहे. आम्ही याच EPUB तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक मापदंडाच्या आधारे ईपुस्तक निर्मिती करीत आहोत. त्यांचा प्रचार व प्रसार करीत आहोत. अनेकांना तांत्रिक सहाय्य करीत आहोत. एकत्रित येऊन एक नवउद्योगनिर्मिती करण्याच्या आमच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. साहित्य निर्मिती सोबतच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याची क्षमता ‘ईपुस्तकांत’ आहे. या क्षेत्रातील आव्हानांना ‘संधी’ मानणाऱ्या उद्योगान्मुख लोकांनी एकत्रित येणे अपेक्षित आहे.
तांत्रिकदृष्ट्या उत्तम ईपुस्तकांच्या निर्मितीसाठी अतिशय कमी खर्च येतो, त्यांना वितरण करण्यात भौगालिक मर्यादा येत नाहीत. ईपुस्तकांच्या विक्रीबाबत आकडेवारी उपलब्ध करून देणे शक्य असते.
लेखनास प्रोत्साहन देणारे अनेक संकेतस्थळ आता उपल्बध आहेत. उत्तम लेखनकौशल्य लपून राहणे फार अवघड आहे. पण ‘ईपुस्तक’ कसे लिहावे, त्यांचा वाचक वर्ग कोणता, त्यांचे विषय कोणते, त्यांना अपेक्षित साहित्य कसे उपलब्ध करून द्यावे, त्याचा प्रचार व प्रसार करणे, लेखकांना आर्थिक प्रोत्साहन देणे या सर्व बाबींवर संघटित प्रयत्न होणे गरजेचे आहे. श्री. अभिषेक ठमके यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यांची स्वतःची ईपुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राहो ही सदिच्छा आहेच. आणि सदैव राहतील.
ईपुस्तक उद्योग भारतात भरभराटीला येणारच आहे त्यात ‘मराठी’च्या वतीने आपल्याला योगदान द्यायचे आहे. ईपुस्तकांच्या कक्षा विस्तारीत होत राहतील. या उद्योगाशी संलग्न व पूरक अशा इतर उद्योगांना देखील चालना मिळेल. वाचन, साहित्य यांच्याशी संबंधित तज्ज्ञांना अधिकची कामे चालून येणार आहेत. उत्पन्नाच्या नव्या व विस्तृत मार्गांवर आपल्याला जायचे आहे.
“वाऱ्याच्या दिशेचा अचूक अंदाज घेऊन शीड उभारल्यास आपण वादळातही निच्छित स्थळी पोहचू शकतो.”
आपल्या अवतीभवती जे काही आधुनिकतेचे वारे घोंघावत आहेत त्यात आपल्याला आपल्या प्रगतीचे गलबत हाकायचे आहे. आपल्याला इच्छित दिशेला देखील जायचे आहे. या प्रवासात प्रत्येक पिढीला काहीतरी अद्भुत अकल्पित अनुभवता येतेच. आपण सध्या तशाच अनुभवातून जात आहोत.
चला एकत्र येऊया… उत्तम साहित्य जगभर पोचवूया.
'अर्थ'चा हा दिवाळी अंक लोकप्रियतेचे आधीचे सारे निकष पार करून अधिक लोकप्रिय होवो ही सदिच्छा.
आपणां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना. उत्तमोत्तम लिखाण तुमच्या कडून होत राहो व वाचकांचा वाचनानुभव अधिक समृद्ध होत राहो.
धन्यवाद.
शैलेश खडतरे