मध्यंतरी,
मान्याच्या शाळेत 'सेक्स एज्युकेशन' वर सेशन होतं. दोन आठवड्यापूर्वी शाळेतून तसं रीतसर घरी लेटर पोहोचतं झालेलं. कंपल्शन नव्हतं, ज्यांना यायची इच्छा आहे, त्यांनी तसं नाव नोंदवायचं. मी माझं नाव लगेच बुक केलं. पहिली-दुसरी, तिसरी-चौथी आणि पाचवी-सहावी असं इयत्तेनुसार, म्हणजेच वयानुसार वेगवेगळे सेशन होते.
मान्या पहिलीत (वय - सात वर्ष), त्यामुळे पहिली-दुसरी वाल्यांचं पहिलंच सेशन होतं. एक मोठा हॉल, त्यात मोठी स्क्रीन, एक बोर्ड आणि बाजूला पुस्तकांचा टेबल. पहिली-दुसरीतली मुलं आणि त्यांचे पालक आपापली खुर्ची पकडून तिकडे हजर होते. मी आणि मान्यानेही एक खुर्ची पकडली.
पुर्ण सेशन मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारले, ते प्रश्न आपल्या पालकांबरोबर डिस्कस करायला सांगितले ... काही पजल्स गेम होते..
सेशन सुंदरच होतं.
काय सांगितलं ? सेक्स कसा करतात ?
छे ! असं काहीच सांगितलं नाही. पण मग सेक्स एज्युकेशन म्हणजे दुसरं आहे तरी काय ?
त्यांनी मुलातला आणि मुलीतला शारीरिक फरक सांगितला.
पुरुषांना Penis आणि बायकांना Vulva असतो, बाळ आत पोटात (uterus) किती आणि कसं वाढतं, बाळ कुठून जन्माला येतं,
अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हसत-खेळत सांगितली. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या निरनिराळ्या शरीराच्या भागांची माहिती करून दिली.
जेव्हा त्यांनी सांगितलं, 'बाळ तयार होण्यासाठी पुरूषातली एक गोष्ट आणि स्त्रीमधली एक गोष्ट लागते', तेव्हा आमची कारटी लगेच उवाच, "बट हाऊ, हाऊ दे मीट"... हुश्श !
आता यावर खरंतर मुलांना गप्प करायची वा विषय फिरवण्याची गरज नाही, त्यावर त्यांना विश्वासाने आपल्याला सांगावं लागतं, की काही गोष्टी तु थोडीशी मोठी झालीस की कळतील. यु हॅव टू बी पेशंट...
त्या सार्या सेशनमधलं मला बेस्ट वाटलं, ते स्त्री आणि पुरुषांची तुलना.
तुमची आवड काय, तुमचा रंग काय, तुमची उंची काय, तुमची वागणूक काय .... यावर मुलगा-मुलगी ठरत नाही. तर तुमच्या शारीरिक बाबींवर मुलगा-मुलगी ठरतो.
हे सांगण्यासाठी त्यांनी सुंदर सोपी उदाहरणं दिली.
काही अशाप्रकारे,
मुलंच फक्त Strong असतात असं नाही,
Sophie झाडावर भराभर चढते, उड्या मारते आणि सायकल देखील छान चालवते...
Sophie एक मुलगी आहे.
मुलांनी मुलींसारखं रडायचं नाही, असं नाही,
James ला पण कधीकधी Sad वाटतं, त्यालाही पडल्यावर लागतं, मग त्यालाही रडू येतं ...
James एक मुलगा आहे.
फक्त मुलीच ज्वेलरी घालतात, असं नाही,
Jack कडे त्याच्या आजोबांनी दिलेली छान अंगठी आहे. आणि त्याला ती घालायला आवडते...
Jack एक मुलगा आहे.
... वगैरे.
मुलामुलींतला हा (शारीरिक आणि मानसिक) भेद त्यांना ह्या कोवळ्या वयातच कळणं गरजेचं आहे.
सेशन झाल्यानंतर मी बरीच पुस्तकं घेतली. पहिल्यांदाच पुस्तकांची एवढी खरेदी केली असेल.
वयानुसार पुस्तकं आहेत. (खाली फोटो टाकलेत त्याचे)
--------------------------------
साला कमाल वाटते मला.
इथे सात वर्षांच्या मुलांना "सेक्स एज्युकेशन" देतायत ही लोकं आणि भारत अजूनही 'सेक्स एज्युकेशन' वर बोलायला तयार नाही.
नुकताच झालेला कोपर्डीतला बलात्कार,
आपण काय करणार, तर निषेध करणार नेहमीप्रमाणे, नाहीतर मग क्रूर आहे, नराधमाला फाशी द्या ... वगैरे बरीच पोपटपंची करणार.
राजकारणी लोक राजकारण करणार, जातीयवादी लोकं जातीयवाद करणार, आणि आपल्यासारखी लोकं आपापल्या भिंती रंगवणार. शेवटी आपल्या संवेदनशील भावना व्यक्त करायलाच हव्यात.
रेप झाले कि आपण कशावर भाष्य करतो, तर त्याचं लिंग छाटा, त्याला कडक शिक्षा करा, त्याला अमुक करा, तमुक करा... बरं, काय होईल ह्याने ?
अशी प्रकरणं महिनाभर चालतात, मग विस्मरणात जातात... पण पुढे काय ?
नवीन काहीतरी होणार, आपण आपल्या मूडनुसार व्यक्त होणार.... झालं येवढंच. चक्र आहे तसं चालू आहे... बदल घंटा कुठे नाही आहे.
आपण बेसिक मानसिकतेपर्यंत पोहोचतच नाही. एखादी मानसिकता घडते कशी, बिघडते कशी ह्यावर विचार नको का व्हायला ? त्याच्या मुळापर्यंत नको का जायला? भारतात रोग संस्कृतीच्या पदराखाली वाढत राहतो आणि हाताबाहेर गेला की रोग्याला संपवलं जातं. रोग फक्त रोगी बदलत राहतात इथे.
तर, पाश्चिमात्य देश रोगावर संशोधन करतात, तो पसरू नये याचा प्रत्येक Angle ने विचार करतात, इलाज करण्यासाठी धडपड करतात ....
काही म्हणतात, "सेक्स एज्युकेशन दिल्याने गुन्हे थांबणार नाही"...
खरंय, पण गुन्हे तर शालेय शिक्षण दिल्याने पण थांबणार नाहीच. मग शाळेत तरी का पाठवायचं ?
सेक्स एज्युकेशन ही गरज आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या भारतासारख्या देशात तर ती तातडीची गरज असायला हवी. मुलांना जेवढं लहान आपण समजतो किंवा ठेवतो, तेवढी मुलं लहान नसतात...
सेक्स एज्युकेशनमुळे एक महत्वाची गोष्ट घडते, ते म्हणजे -
पालकांचा आणि पाल्यांचा या विषया संदर्भातला संवाद वाढतो. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा मारता येतात, पाल्यांना समजून घेता येतं, त्यांच्या मनातल्या असंख्य गोष्टी लक्षात येतात.... ज्या कदाचित कोणाला विकृत वाटू शकतील...
योग्य वेळी, योग्य उपचार करण्यासाठी पहिले आजाराचं निदान करायला हवं.... येवढी समज तरी असायला हवी कोणा विकसनशील देशाला...
(http://www.sexeducationaustralia.com.au/)