चीनमध्ये लूपू राजा होता. त्याचे मोठे उद्योग, अचाट आणि विचित्र! मानवी हृदयावर न कोरलेल्या गोष्टी विसरल्या जातात! परंतु घोर पापांच्या कथा, त्या कोण विसरेल? त्या युगानुयुग चालत येतात. शापित अशा कथा.
लूपूने साम्राज्य वाढविले आणि संरक्षणासाठी उत्तरेकडे भिंत बांधायचे ठरविले. भिंतीजवळ हाडांच्या राशी पडत आहेत. दृश्य बघून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. सर्वत्र जुलूम आणि भीति! आकाश रडू लागले, भूमाता रडू लागली. ग्रंथ जाण्यात येत आहेत, पंडितांना ठार करण्यात येत आहे, जिवंत पुरण्यात येत आहे. कायदा नाही, नीतिनियम नाही. धर्म सारा लोपला.
मेंग चियांग निघाली. ती पतिव्रता सती. तिचा पती कामाला सक्तीने नेण्यात आला. ती रडत बसे. किती कृश झाली आहे बघा. गाल खोल गेले. डोळे निस्तेज. अरेरे. तिचे लक्ष उत्तरेकडे आहे. तेथे कडक हिवाळा आहे! माझा पति! पुस्तकांत रमणारा. नाजुक, सुकुमार! त्याच्याने दगडधोंडे विटा कशा उचलल्या जातील? कोण त्याची कींव करील? कठोर अधिकारी हुकुम सोडीत असतील, वादीचे चाबूक कडाड् उडवित असतील. हे का त्याच्या नशिबी असावे? हे घर स्मशान वाटते. कशी येथे राहू? किती वाट पाहू? हृदय दुभंगते. मी त्याला शोधायला जाणार, भेटायला जाणार! दहा हजार मैल का असेना अंतर! मी जाईन.
ती निघाली. ती कोमलांगी, कृशांगी निघाली. शरीराने दुबळी परंतु आत्मा वज्राचा होता. साधे सुती लुगडे ती नेसली होती. ना अलंकार ना काही. तिचे ते सौंदर्य हाच तिचा दागिना. सौंदर्याचा प्रकाश फेकीत वा-यांतून, वादळांतून, पावसांतून ती निघाली. जवळच्या गाठोडयात काय आहे? पतीसाठी हाताने तयार करून आणलेले गरम कपडे! उत्तरेकडे चावरी थंडी आहे. जात होती. वाटेत नद्या लागत आहेत. दिवस मावळत आहे. गायीगुरे घरी येत आहेत. चूल पेटत आहे, परंतु ती? तिला विसांवा नाही. अनन्त पृथ्वी, अनन्त आकाश! एकटी, हो एकटी. जा एकटीच रडत, अश्रूंचे सडे घालीत. पावले उचलत नाहीत. थकली बिचारी. पदर चिखलात पडत आहे; तिला भान नाही. ओचा सुटला; कळत नाही. ते उघडे हात थंडीने हिरवे निळे झाले.
जातांना तो म्हणाला होता, ''मी परत येईन काय भरवसा? राजाचा हुकुम! कोणी मोडायचा? आता एका उशीवर डोकी ठेवून आपण पाखरांच्या जोडप्यांप्रमाणे पुन्हा प्रेमाने पडणार नाही. प्रिय सखी, पतिव्रते, खोटे स्वप्न मनात नको खेळवू. मनात आशा नको. पुन्हा परत येणे कठिण आहे.''
नाथ, त्या शब्दांत करुणा होती. तुम्ही का माझा मार्ग मोकळा करून जात होता? आपले वैवाहिक जीवन का विसरलात? मासा आणि पाणी तसे आपले एकत्र जीवन. माझे हृदय शुध्द आहे. पातिव्रत्य हेच माझे बळ. मायबापांची शिकवण का विसरू? मी येणार तुझ्या पाठोपाठ, येणार भेटायला, तुला गरम कपडे द्यायला. तुला मदत करायला, दहा हजार मैल अंतर असले म्हणून काय झाले?
दु:खाने ती दग्ध झाली होती. जरा काही सळसळले तरी घाबरे. आज थंड चावरे वारे वहात आहेत. कावळे चालले घरटयांकडे. ही कोठे जाणार? घंटांचा आवाज येत आहे. मिण मिण दिवा दूरचा दिसत आहे. गाव आहे जवळ? गाव नव्हता. त्या जंगलात ते देऊळ होते.