''आनंदराव, तुम्ही निवडणुकीला उभे रहाच. आम्ही तुमच्यासाठी हिंडू फिरू, आमचे टांगे देऊ, बैलगाडया देऊ. तुम्हाला निवडून आणू. नाही म्हणू नका. माघार घेऊ नका.'' रघुनाथराव म्हणाले.
''परंतु दौलतरावही उभा रहात आहे. आम्ही दोघे मित्र. कोणी तरी एकाने बसले पाहिजे.'' आनंदराव म्हणाले.
''तुम्हीच काय म्हणून माघार घ्यायची? हा दौलत्या अलिकडे जरा शिरजोरच झाला आहे. तुमच्यासाठी त्याने बसले पाहिजे. तुमचे केवढे घराणे, केवढा तुमचा तेगार'' धोंडीबाने भर दिली.
आनंदरावांच्या दिवाणखान्यात मंडळी बसली होती. पानसुपारीचे तबक होते. त्यात सिगारेटची पेटीही होती. नोकराने चहा आणून ठेवला. मंडळी पीत होती. चर्चा चालू होती. जिल्हा बोर्डाची निवडणूक. तशी महत्त्वाची नव्हती. परंतु गावातील निरनिराळे गट दौलतराव नि आनंदराव यांना चढवीत होते.
आनंदराव नि दौलतराव दोघे मित्र. दौलती लहानपणी गरीब होता. परंतु तो अति मेहनती नि कष्टाळू. पैसे शिल्लक टाकून त्याने बिघा दोन बिघे वावर विकत घेतले आणि केळीचा मळा केला. दौलती नि त्याची बायको. दोघे कामाला वाघ. पहाटे उठून दौलती मोट चालवायचा. पुन्हा सकाळी दुसरीकडे कामाला जायचा. लढाईच्या काळात केळयांना फारच भाव. दौलतीने बरीच माया जमवली. त्याचे सुरेखसे घर बांधले. मोठया मुलास तिकडे दूर बोर्डिंगात शिकायला ठेवले. गावात त्याला मान मिळू लागला. आनंदराव जन्मजात श्रीमंत, मोठी इस्टेट, जमीन जुमला भरपूर. या दोघांच्या प्रेमामुळे गावात एकी होती. दौलतराव गरीबांचा वाली, आनंदराव बडया लोकांचा प्रतिनिधी परंतु हे दोघे मित्र. त्यामुळे गावात बेदिली माजली नाही. गावात सुधारणा आली. गावक-यांनी रस्ते सुधारले. गटारे बांधली. गावातील तळे स्वच्छ केले. गावाभोवती नवीन वनराई उभी केली. गावात आनंद होता. रामनवमीला उत्सव व्हायचा. नाटक व्हायचे. नाटकात आनंदराव, दौलती हेही कामे करायचे. आनंदरावांचा मुलगा जयंन्ता आणि दौलतीचा मुलगा रवि. दोघे मित्र. शाळेत एके ठायी बसत. एकमेकांना विसंबत नसत. गावच्या नदीत दोघे डुंबायचे, वनराईत झाडांवर चढायचे. कधी रवि पावा वाजवी तर जयंता गाणे म्हणे. कधी रवि नाचे तर जयंता ताल धरी. दोघे आता तिकडे छात्रालयात शिकत होते. त्यांची मैत्री पाहून सर्वांना कौतुक वाटे.