''प्रार्थना?'' तो शब्द मेरियोला जणू चमत्कारिक वाटला.

''होय, तो प्रार्थना करी. त्याला जर विचारले का करतोस प्रार्थना, तर म्हणायचा एका सद्हेतूने.''

मेरियोची मुद्रा अगम्य दिसली. हृदयात कोणी सुरी भोसकावी तसे त्याला झाले. परंतु आपण मित्राची चिंता वाहिली नाही, आपण आपल्याच वैभवाच्या गुर्मीत राहिलो, असे त्याच्या मनात आले नाही. त्याला निघणे प्राप्त होते. रोम शहरात धर्माचार्यांसमोर त्याचे प्रवचन व्हावयाचे होते. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. बडी बडी मंडळी प्रवचन श्रवणार्थ आली होती. परंतु त्याला काही सुचेना. तो घामाघूम झाला. निराशेने त्याने मित्र दिसतो का पाहिले. परंतु तो तर देवाघरी गेला होता. ती जाणीव त्याला झाली. प्रवचन जमेना. लज्जेने अर्धमेला होऊन ते व्यासपीठ सोडून तो निघून गेला.

परंतु असला दुबळेपणा लाजिरवाणा असे त्याला वाटले. ही भावना जिंकून घ्यायचे त्याने ठरविले. पुढील प्रवचन त्याने काळजीपूर्वक तयार केले. इटलीतील सर्वांत मोठया प्रवचनकाराची शक्ती ती का सामान्य माणसाच्या प्रार्थनेवर अवलंबून होती? छे: ती गोष्ट त्याला सहन होईना. तो पुन्हा प्रवचनाला गेला. परंतु मागीलपेक्षांही वाईट अनुभव आला. मेरिया हतबुध्द झाला. तो गांगरला. आपण पडतो असे त्याला वाटले. त्याला हात धरून जवळच्यांनी नेले. जाताना तो स्फुंदत म्हणाला, ''होय. तो मित्र. त्याचीच ती शक्ती, त्याचे ते बळ. मी केवळ फोलपट आहे. निस्सार वस्तू.''

वैद्य म्हणाले, ''फार काम करता. म्हणून ही दशा. विसावा घ्या.'' परंतु तो आपल्या पहिल्या मठात आला. तेथेच ऍन्सेलमो त्याच्या सेवाचाकरीसाठी प्रथम आला. त्या मठाजवळ ऍन्सेलमो पुरला गेला होता. तेथे मेरियो एकांत जीवन कंठू लागला. तेथील बागेत एकटा फिरे. मित्राच्या समाधिजवळ बसे. त्याच्या जीवनात क्रांती झाली. अहंकार हरपला. वृत्ती नमली.
एके दिवशी तो मित्राच्या समाधिजवळ गुढगे टेकून डोळे मिटून बसला होता. जवळच मठपतिही येऊन बसले. मेरियोने डोळे उघडले. मठपतींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांनी विचारले,

''बाळ, काय पाहिजे तुला? वक्तृत्व पुन्हा पूर्ववत यावे म्हणून का ही प्रार्थना?''

''नाही तात; त्याहूनही थोर देणगी त्याने मला द्यावी म्हणून ही प्रार्थना. आणि ती देणगी म्हणजे नम्रतेची, निरहंकाराची.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel