''रडू नको. उद्योगी हो. कष्ट कर. वेळ उगाच नको दवडू. उत्साहाने काम करा. हे बघ. अरे माझी मुले रात्रंदिवस खपतात तेव्हा ही सुंदर फुले फुलतात. माझे लहानसे जीवन. परंतु हे वैभव बघ. जवळच्या दगडाजवळही गोड बोलून मी मैत्री जोडली. माझी कोवळी मुले त्यांच्या अंगाखालीही गेली. आणि त्यामुळे ही निळी फुले फुलली. निरनिराळी जमीन, निरनिराळे दगड, सर्वांजवळ मी जातो. आणि प्रेमाने एकजीव होऊन हे अनंत विविध वैभव मिळवतो. मी लहान आहे. परंतु वनदेवतेचे मजवर अपार प्रेम. मी म्हणेन तसे होते. ईश्वराने विश्वाची संपत्ती जणू माझ्याजवळ आणून दिली. नाहितर कोठून देऊ अन्नाची डबी, वस्त्रांचे गाठोडे, पुस्तकांची पेटी? खरं ना? तुम्ही भारतीय बाळे अशी व्हा. श्रमणारी, प्रेम करणारी, प्रयोग करणारी, व्हा. जा.''

प्रणाम करून राजा निघाला. तो आजीबाईच्या पाया पडला.

''ये. शतायुषी हो,'' ती म्हणाली.

राजा आपल्या गावी आला. डोंगराच्या पायथ्याशी लहान झोपडी करून राहू लागला. त्याने तेथे प्रयोगालय घातले, ग्रंथालय सुरू केले. एक पंचा नेसी. एक कोपरी अंगात. वाची, प्रयोग करी. आजुबाजूची मुले येऊ लागली.

सावत्र आई एके दिवशी त्याच्याकडे आली व म्हणाली, ''कोणी दिले हे?'' त्याने हकीगत सांगितली. ती आपल्या मुलाला म्हणाली, ''जा रानात. माग त्या फुलझाडाजवळ.'' तिचा मुलगा भिकू निघाला. त्याला ती म्हातारी भेटली. परंतु त्याला प्रेमाने बोलणे, नमस्कार करणे माहीत नाही. तरीही म्हातारी म्हणाली,

''या झाडाजवळ माग. मला मिळाले तसे सर्वांना मिळो असे म्हण. त्यांना इकडे यायला सांगेन असे म्हण.''

तो काही बोलला नाही. भिकू झाडाजवळ जाऊन म्हणाला,

''झाडा झाडा, मला सारे दे.''

''सारे म्हणजे काय?''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel