''तो पलीकडचा हॉटेलवाला पैसे दिल्याशिवाय मला सोडीत नव्हता. आणि तू नवीन साडी आणतेस! तुझ्याजवळ पैसे आहेत. लपवून ठेवतेस,'' असे बोलून त्याने तिच्या फाडकन तोंडात मारली.
वीराच्या तोंडाला घाण येत होती. चार रुपये दारूत उडवून तो आला होता. त्याची तार आणखी चढत होती.
''मुसमुसु नकोस. ओरडू नकोस,'' असे म्हणून कोप-यातले लाकूड त्याने उचलले. नीलमच्या डोक्यावर त्याने हाणले, पाठीवर मारले. नीलम खाली पडली. त्याने तडाखे हाणले. इतक्यात चिनी उठली. तिने विचारले,
''बाबा, माझे परकर पोलके?''
तो काही बोलला नाही. चिनी बापाजवळ जाऊन रडू लागली. त्याने तिच्या एक थोबाडीत मारली. आणि घराबाहेर निघून गेला. दुर्गादेवीच्या देवळात झोपण्यासाठी एक चादर घेऊन गेला.
नीलम उठली. तिने चिनीला जवळ घेतले. तिच्या केसांवरून हात फिरवीत होती.
''रडू नको हं. तुझ्यासाठी परकर पोलके उद्या मी आणीन हं. उगी, उगी.''
आईच्या मांडीवर चिनी होती. ती आईच्या तोंडाकडे पहात होती. आईच्या डोळयांतील अश्रू तिला बघवत ना. इतक्यात चिनीच्या गालावर एक थेंब पडला! रक्ताचा थेंब. नीलमने तो पटकन पुसला. तिने आपल्या केसांत बोट फिरवले. डोक्यातून रक्त येत होते. नीलम मनात म्हणाली, ''हे भगवान, तू मला स्त्रीचा जन्म कशाला दिलास?''
नीलम दूरच्या भविष्याकडे बघत होती. आणि या चिनीचेही असेच होईल का? असे मनात येऊन तिचे डोळे भरून आले. चिनीच्या तोंडावर ते दयेचे, सहानुभूतीचे, वात्सल्याचे अश्रू पडले.
''आई, तू रडतेस, कां रडतेस?'' चिनीने विचारले.
त्या खोलीत मंद प्रकाश होता. एक माता मुलीच्या केसावरून हात फिरवीत होती. काय होते तिच्या मनात? त्या मुलीच्या केसातून ती आपली बोटे प्रेमाने का फिरवीत होती?
प्रा. सदाशिव वोडीयार यांच्या गोष्टीवरून