''दोन कमी आहेत रे.''
''कमी? बरे ह्या घ्या.''

दौलत विश्वासू होता. परंतु एका गृहस्थाने त्या वडया मोजताना पाहिले होते. तो मनुष्य खोटे बोलत होता.

''त्या गरीब पोराला का फसवता? बिचारा दिवसभर खपवित हिंडतो. दोन वडया का घेतल्या जास्त?'' तो गृहस्थ म्हणाला.

''तुम्हाला काय जरुर? मोठे गांधी की नाही तुम्ही?'' तो लफंगा म्हणाला. तेथे भांडण सुरू झाले.

''जाऊ दे. दोन वडया गेल्या तर गेल्या. भांडण नको. भांडण वाईट. आईने मला सांगितले आहे गाडीत भांडू नको. जाऊ दे.'' तो लहान दौलत म्हणाला.

त्या लफंग्याला काय वाटले कोणास माहीत? तो म्हणाला, ''आणखी एक आण्याच्या दे.''

दौलतने आठ मोजून दिल्या. त्या माणसाने दोन परत दिल्या.

''घे बाळ, तुझ्या तोंडून गांधीमहात्मा जणू बोलत आहे,'' तो म्हणाला.

दौलत हिंडत दुस-या डब्यांत गेला. दरवाजातून बाहेर पडून झोळीत डबा घालून गजांना धरून तो गेला. लहान मुले. परंतु परिस्थितीने त्यांना शूर बनविले. ना मरणाची भीति, ना कशाची. दोन आणे अधिक कसे मिळतील याची चिंता. असे करता करता कर्जत आले. दौलत उतरला. तेथे तो पाणी प्यायला. आणि पुण्याची मेल आली. तो तिच्यात चढू लागला. तो तेथे दुसरा एक मुलगा खाटीमिठी विकणारा होतो. तो त्याला आत येऊ देईना. तो जरा धट्टाकट्टा होता. तो दारात बाहेर उभा राहिला. दौलतही गजाला धरून उभा राहिला. तो दुसरा मुलगा एका हाताने दौलतच्या तंगडया ओढू लागला. गाडी तर सुरू झाली. लठ्ठ मुलगा का दौलतला खाली लोटणार?

''येऊ दे त्याला. का त्याला लोटणार तू? हो दूर.'' तेथील एक तरुण पुढे होऊन म्हणाला.

तो धट्टा मुलगा बाजूला झाला. त्या तेजस्वी तरुणाने दौलतला आत घेतले.

''खाटीमिठी आणेमें आठ आठ.'' दौलत म्हणाला.
''यहां नही बेचना'' तो दुसरा मुलगा म्हणाला.
''विकणार.''
''विकण्याची परवानगी नाही.''
असे त्या दोघांचे भांडण जुंपले. तो गाडीतला चहा विकणारा आला.

''क्यौंरे. क्यौं आया? एक दफे कहा ना यहाँ आना नहीं. यहाँ बेचनेकी परवानगी नही. यहाँ हमारा राज है'' तो चहा विकणारा गर्जला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel