''तुझ्याजवळ असेल नसेल ते.''
''तू इतरांना इकडे पाठवशील?''
''नाही. हा पत्ता कोणाला मी देणार नाही. नाहीतर माझ्याप्रमाणे दुसरेही सुखी होतील, श्रीमंत होतील. माझे पाहतील, त्याहून अधिक तुमच्याजवळ मागतील. झाडा, झाडा, मी पत्ता सांगणार नाही. तो राजा वेडपट. त्याने केले तसे मी करणार नाही. तुम्हांला त्रास होईल असे मी करणार नाही. मी सुखी झालो म्हणजे पुरे. मला भरपूर खायला मिळो. माझी चंगळ चालो.''
तो असे म्हणताच आजूबाजूने दगड येऊ लागले, काटे येऊ लागले. भिकू ओरडू लागला. ती म्हातारी दूर उभी होती. ''मी सांगितले होते तरी ऐकले नाहीस. जा आता पळ.''
भिकू पळत सुटला. बाण यायचे थांबले. त्या झाडाने थोडी चुणुक दाखवली. सूडबुध्दी त्यात नव्हती. जागृति यावी हा हेतू.
राजाचे नाव सर्वत्र झाले. तो सर्वांना देई. सर्वांबरोबर खपे. परंतु त्याने त्या वस्तू आता कपाटात ठेवल्या. आता तो आयते खात नसे. आयते मागत नसे. त्याने पडित जमीन लागवडीस आणली. खतांचा शोध लावला. श्रम हाच परीस असे तो म्हणे. गावाजवळ देवकापूस त्याने लावला. गावाला कापड किती हवे त्याची योजना केली. आणि गावात माग लागले. छोटी छोटी मुले फटक फटक माग चालवीत, म्हातारी माणसे कातीत. गावात सारे स्वच्छ. ज्ञान, विज्ञान आरोग्य सारे त्या गावात. त्या गावची कीर्ति सर्वत्र गेली. ते गाव तीर्थक्षेत्र झाले. राजा नि त्याचा गाव सुखी झाला, तसे तुम्ही नि तुमचे गाव सुखी होवोत. संपली गोष्ट, तुमचे होवो अभिष्ट.
''छान होती गोष्ट.''
''नवभारताच्या निर्मितीची गोष्ट.''
''नवसमाज निर्मितीची.''
''पुरे आता. पळा. मला आहे काम. जय हिंद.''