''जोडे बनवायचे काम होते, वेळ नाही मिळाला ह्या आठवडयात.''
''खोटे बोलतोस. ते रंग कशाला मग आणले होतेस? मी पाहिले आहे. काढ ती रंगीत मूर्ती.''

कृष्णाने घरात घुसून ती मूर्ती काढली. ती घेऊन निघाला. मुरुगनला वाटले आपले काळीजच कुणी काढून नेतो आहे. आणि त्या बलिदानाच्या - होय, ज्या ठिकाणी मुरुगनच्या कलेचे बलिदान तो करीत होता त्या - दगडापाशी तो आला. मुरुगनचा सूड उगवायची त्याची ती जागा. परंतु बाबाजींची मूर्ती! ती जणू करुण दृष्टीने कृष्णाकडे पहात होती. किती अपूर्व कला. जणू बाबाजीच समोर उभे असावेत. ती मूर्ती, मूर्ती नव्हती. कलाकाराची सारी कला, सारी कृतज्ञता, सारे प्रेम त्यात होते. कृष्णाही विरघळला. त्याच्याही डोळयांत दोन अश्रु आले. त्याच्या मनातला सारा द्वेष त्या दोन अश्रूबिंदूंत लुप्त झाला. त्या मूर्तीकडे तो निर्निमेष पहात राहिला. त्याची जणू समाधि लागली. आणि तेथून पुन्हा तो मुरुगनच्या झोपडीपशी आला. ती मूर्ती घेऊन आला.

''भाई मुरुगा'' अडखळत अडखळत त्याने हाक मारली.

कृष्णाचा, त्याच्या किसनदादाचा आवाज त्याने ओळखला. पण त्याल भाई कोणी म्हटले? तो बाहेर आला.

''भाई मुरुगन मला माफ कर. मी फार पापी आहे. तुझा घोर अपराध केला आहे. माफ केल्यावाचून नाही जाणार मी येथून. म्हण माफ केले.''

''पण झाले तरी काय? नि ही मूर्ती परत घेऊन आलात? ती मी तुम्हांला दिली. खरंच अगदी खुषीने दिली. जा घेऊन.''

''नाही. हे माझे बाबाजी नाहीत. खरोखर तुझे ते बाबाजी. मी त्यांचा नालायक वारस. किती प्रेम त्यांचे तुझ्यावर. मरताना तुझे नाव घेऊन गेले. पण मी चांडाळाने तुला नाही येऊ दिले शेवटच्या दर्शनाला. तूच खरा यांचा मुलगा शोभतोस. मला माफ कर. मी नाही समजू शकलो तुझ्या प्रेमाला.''

मुरुगनच्या डोळयांत अश्रू आले. त्याने मूर्ती घेतली. म्हणाला, ''दादा माझी इच्छा पूर्ण झाली. ही मूर्ती म्हणजे माझा प्राण. माझा कलेजा. माझे सर्वस्व ओतून मी ही बनविली. ही मूर्ती आपल्याजवळ ठेवण्याची आशा पूर्ण झाली. आता मी शपथ घेतो, पुन्हा नाही मूर्ती करणार. हीच माझी शेवटची मूर्ती. जोडे बनवायचे माझे काम. ते करण्यातच मला आनंद आहे.''

तमिळ लेखक जगन्नाथ अय्यर यांच्या कथेच्या आधारें

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel