लाडकूची गोष्ट
एका गावात एक मुलगा होता. त्याचे आईबाप लहानपणीच वारले. मावशीने त्याचा सांभाळ केला. 'माय मरो, मावशी जगो' म्हणच आहे. मावशीलाही कोणी नव्हते. भाच्यावर तिचा सारा जीव. भाच्याचे नाव लाडकू. लाडकू दिवसभर हिंडे; फिरे. काम ना धाम. संध्याकाळी घरीही वेळेवर यायचा नाही. मावशी म्हणायची, ''वेळेवर येत जा रे घरी.'' लाडकू लौकर का येता आले नाही याच्या रोज नवीन सबबी सांगायचा. आणि मावशीचा राग शांत व्हायचा.

एके दिवशी रात्रीचे दहा वाजले तरी लाडकूचा पत्ता नाही. मावशी दारात उभी होती. रागाने म्हणाली, ''त्याला आज घरातच घेत नाही.''

इतक्यात धांपा टाकीत कावराबावरा झालेला लाडकू आला. त्याच्या तोंडातून जणू शब्द फुटेना. मावशीने विचारले,

''काय झाले लाडकू? असा का?''

''काय सांगू? मरणाची वेळ आली होती मावशी. खरेच सांगतो.''

''काय झाले? आत ये बाळ.''

घरात येऊन भाचा म्हणाला, ''लौकर घरी येण्यासाठी म्हणून निघालो. परंतु त्या जंगलातून वाघ आला. मी पटकन् झाडावर चढलो. वाघ झाडाच्या मुळाशी बसलेला. खाली कसा उतरणार मी? आणि मावशी, मला एकीची घाई झाली. मी वरूनच मग एकी करू लागलो. तो काय आश्चर्य? ती धार धरून वाघ वर येऊ लागला मावशी. मी घाबरलो. एकदम एकी बंद झाली. परंतु धार थांबल्यामुळे वाघ धपकन् खाली पडला. आणि दगडावर आपटल्यामुळे मेला. मी हळूच खाली उतरलो. न जाणों असली धुगधुगी तर पाठोपाठ यायचा म्हणून पळत आलो. मावशी, खरेच लौकर येणार होतो घरी. उशीर झाला म्हणून रागवू नकोस.''

मावशीची हसता हसता मुरकुंडी वळली व म्हणाली, ''लाडकू, लबाड आहेस हो तू. आज तुला घरात घेणार नव्हते. बरे, चल जेवायला.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel