भीम येऊन म्हणाला, ''देवा, चल जेवायला.''
''अरे तुम्हांला का वेड लागले? मला का आग्रह लागतो? भीमा, फारच दुखत हो आज डोके.'' देव म्हणाला.
''कृष्णा, मी तुला कधी कसली प्रार्थना आजवर केली नाही. अर्जुनाने तुला घोडे हाकायला बसविले. त्याने प्रतिज्ञा कराव्या, तुला त्या निस्तराव्या लागायच्या. मी सा-या जन्मात आज तुला प्रार्थायला आलो. ही पहिली आणि शेवटची प्रार्थना. चल हो देवा.''
''नको हो भीमा, खरे जा तूं. धर्माला सांग की डोके फार दुखते आहे म्हणून.''
भीम खिन्न वदन करून निघाला. परंतु तो घरी नाही गेला. कृष्णाच्या घराजवळ महादेवाचे मंदीर होते. त्या मंदीरात भीम गेला. गाभा-याचे दार लावून तो ओक्साबोक्शी रडत बसला.
कृष्ण हंसत हंसत बाहेर आले. मनांत म्हणाले, ''एकजणही म्हणाला नाही की येणार नसशील तर येथें डोके फोडतो म्हणून. फुकट सारे.'' ते बागेत आले तो त्यांना मोठा हुंदका ऐकू आला. भीमाचे रडणेंही भीमासारखेच. कृष्ण त्या रडण्याच्या अनुरोधाने मंदिरात आले. गाभा-याचे दार लावलेले. जोराने धक्का देताच ते उघडले. तो शंकराच्या पिंडीला भीमाच्या डोळयांतील गंगायमुनांचा अभिषेक होत आहे असे दृश्य देवाला दिसले.
''हे रे काय? अरे तू रडतोस? सा-या जगाला तू रडवणारा. भीमा उगी. वेडा कुठला.'' देव त्याला शांत करू लागला.
भीमाला अधिकच हुंदका आला.
''रडू नकोस. चल मी येतो. काय करायचे?'' कृष्ण म्हणाला.
आणि भीमानें डोळे पुसले. त्याचे तोंड हर्षाने फुलले. दोघे हंसतबोलत हातात हात घालून आले. कृष्ण आलेला पाहताच धर्माला अपार आनंद झाला. परंतु बाकीच्यांची तोंडे जरा पाहण्यासारखी झाली होती.
''देवा तूं लबाड आहेस'' अर्जुन म्हणाला.
''देव भावाचा भुकेला'' कृष्ण म्हणाला.