नारायण पिल्ले सत्तर वर्षांचा म्हातारा. त्याच्या चेह-यावर काळाने आपले अस्तित्व सुरुकुत्यांच्या रूपाने दाखवायला सुरुवात केली होती. यौवनाचे कोणतेही चिन्ह तेथे नव्हते. परंतु त्याच्या हातात अजब कला-कौशल्य होते. साध्या मातीतून तो जी चित्रे तयार करी ती सजीव भासत. त्याच्या हातच्या खेळण्यांची सर्वत्र प्रसिध्दी झाली होती.

मुरुगन नारायण पिल्लेचा मानलेला मुलगा. खरा खरा मुलगाही त्याला होता. कृष्ण त्याचे नाव. कृष्ण एक चांगला सुस्वभावी मुलगा होता. आपल्या पित्याच्या हातात असलेले अजब कौशल्य त्याला ठाऊक होते; परंतु त्याचे लक्ष कलेपेक्षा फायद्याकडेच अधिक असे. तो व्यापारी वृत्तीचा होता. तोही खेळणी तयार करी. परंतु ती खेळणी त्याच्या वडिलांच्या खेळण्याइतकी सजीव नसत वाटत. तेच रंग, तीच माती. परंतु त्याच्या बापाच्या हातची खेळणी हजारांतून लोक हुडकून काढीत.

कृष्णाचा व्यवहारीपणा पाहून म्हाता-याला आनंद नसे होत. त्याला दु:ख वाटे. कलेकडे दुर्लक्ष करून केवळ पैशामागे कृष्णा लागला आहे. जीवन सुखाने चालेल इतके तो मिळवित तर होताच. पण तेवढयाने म्हाता-याला ना समाधान, ना आनंद. त्याल वाटे ही मातीची खेळणी पैशा दोन पैशात हा विकील, चैनीने राहील. परंतु त्याचे नाव नाही राहणार मागे. कृष्णाचे वयही तीस वर्षांचे. आता कला ती काय आपलीशी करणार? बापाला दु:ख वाटे की आपल्या कलेची परंपरा चालविणारे कोणी नाही. ही कला आपल्या ह्या पार्थिव देहाबरोबरच नाहीशी होणार की काय याने तो साशंक असे. त्याला गरीबीचे दु:ख नव्हते. दु:ख, कलेची परंपरा नाहीशी होईल याचे होते.

परंतु मुरुगन आला. तो आला तो बागडत नाचतच. म्हणाला, ''नको मला मजुरी की पगार. जेवणखाण द्या, तुमच्या कलेच्या प्रसादाचा मी भुकेला आहे. त्याने माझे पोट भरेल. तृप्त होईन मी.'' मुरुगनला आल्याला १० वर्षे झाली. या दहा वर्षांत नारायण पिल्लेचे हृदय त्याने जिंकून घेतले. तो त्यांना बाबाजी म्हणे. त्यांची सेवा करी. त्याने बाबाजींचे प्रेम मिळविले. कलेच्या बाबतीतली त्याची निष्ठाही अद्वितीय होती. बाबाजींच्या कुटुंबातल्या इतरांनाही त्याचा लळा लागला. मुरुगन निष्ठेने कला आत्मसात करत होता. कृष्णाला वाटले बरा बिनपगारी नोकर मिळतो आहे. खाण्यावारी इतके जीव तोडून कोण करतो काम? परंतु बाबाजी मुरुगनला प्रेम दाखवू लागले; तोच आपला खरा पुत्र मानू लागले तेव्हा कृष्णाच्या मनात मुरुगनविषयी द्वेष निर्माण झाला. त्याला वाटे हा उपटसुंभ बाहेरून आला आणि आज बाबाजींचे मन जिंकून त्यांचा मुलगा बनून बसला आहे. परंतु मुरुगनच्या हातातील स्फूर्ति अद्वितीय होती. म्हाता-याने नुसते वर्णन करावे नि मुरुगनने त्या मातीतून तशीच मूर्ति उभी करून दाखवावी. शिवाय खेळणी करण्याचा त्याचा वेग तरी किती! झटपट त्या मातीतून जणू सजीव मूर्ति उभ्या रहात. त्याचे भावनाशील मन मुरुगनच्याबद्दल प्रक्षोभ दाखवी तर व्यापारी मन म्हणे इतका स्वस्त, इतका मन लावून काम करणारा, जिव्हाळयाचा कारागीर तरी कुठे मिळणार!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel