मुलांनो, तुम्हांला एका साधूची गोष्ट सांगतो. 'हर्मिट' नावाच्या एका इंग्रजी कवितेत मी ती वाचली होती.
एक होता साधु. तो रानावनांत राही. झ-याचे पाणी पिई, झाडांची फळे खाई व देवाचे नाव घेई. त्याच्या मनात नाही आली कधी शंका, नव्हते कधी असमाधान.
परंतु एक दिवस काय झाले सापाने बेडकाला धरताना त्याने पाहिले. साधु विचार करूं लागला. या बेडकाचे काय पाप की असे मरण त्याला यावे? या जगात न्याय आहे की नाही? ज्या देवाचे मी नाव घेतो तो का लहरी आहे? त्याच्या या जगात दुष्टांची चलती व्हावी नि निरपराध का मारले जावेत? शांत सरोवरात दगड टाकला तर एक लाट दुस-या लाटेला जन्म देते, ती तिसरीला. असे हजारो तरंग उठतात. त्या साधूच्या मनात एक लहानसा संशय आला व त्यातून हजारो संशय नवे नवे जन्मू लागले.
चला आपण जगात जाऊन देवाच्या सृष्टीतील प्रकार पाहू तरी असे म्हणून व ते वन सोडून साधु निघाला. किती तरी वर्षांनी त्या वनांतून आज तो या जनांत येत होता. हातांत एक काठी घेऊन खांकेला झोळी अडकवून तो निघाला. त्याला वाटेत एक तेजस्वी तरूण भेटला.
''कोठे जायचे?'' साधूने तरुणास विचारले.
''निश्चित नाही,'' तो तरुण म्हणाला.
''मला तुम्ही बरे साथीदार मिळालात. माझेहि अमक्याच दिशेने जायचे, अमक्याच गावी जायचे असे ठरलेले नाही. चला दोघे जाऊ,'' साधु म्हणाला.
ते दोघे जात होते. सायंकाळ झाली. एकाएकी आकाश मेघांनी भरून आले. विजाहि चमकू लागल्या. कडाड्कडाड् गर्जना होऊ लागल्या. झाडे एकमेकांवर आदळत होती. आणि पाऊस सुरू झाला. मुसळधार पाऊस. जणू प्रलय ओढवला. ते दोघे तरुण भिजून ओलेचिंब झाले. जवळपास ना दिसे कुठे गाव ना काही परंतु पाऊस थांबला. जिकडे तिकडे नद्यानाल्यांना भयंकर पूर आले होते. पाण्यातून दोघे जात होते. तो त्यांना दूर अंधूक उजेड दिसला. गांव असेल, घर असेल असे त्यांना वाटले. दोघे पळत निघाले. गारठलेल्या शरीरांत पळण्यामुळे उष्णता आली. तो एक प्रचंड वाडा होता. त्यातूनच तो मिण मिण उजेड त्यांना दिसला होता. त्यांनी त्या भक्कम दरवाजावर दगडाने मोठमोठयाने आवाज केला. दार उघडेना. परंतु यांनी प्रयत्न सोडला नाही. अखेर कोणीतरी दिवा घेऊन येत आहे असे वाटले. एक वृध्द गृहस्थ आला. त्याने दरवाजाची फक्त मधली लहान दिंडी उघडली.
''कोण पाहिजे? अपरात्री का ठोठावता'' त्याने निष्ठुरपणे विचारले.
''आम्ही मुशाफीर आहोत. पावसाने भिजून ओलेचिप्प झालो. थंडीने कुडकुडत आहोत. आजच्या रात्रीला निवा-याची जागा द्या. नाही म्हणू नका,'' साधू म्हणाला.