जो प्रकार शेतक-यांच्या बाबतीत तोच कामगारांच्या बाबतीत. 'उत्पादन वाढवा, उत्पादन वाढवा ' म्हणून त्यांना येताजाता सारे डोस पाजत आहेत. कोटयावधींचा नफा उकळणा-या मालकांसाठी का अधिक उत्पादन करायचे ? ज्या कारखान्यात आपण श्रमतो, तेथील माल जनतेच्या कल्याणार्थ आहे, जनता पिळली जाणार नाही, काळेबाजार होणार नाहीत, तेथील नफा धनवतांच्या विलासात, दगडी राजवाडयात उधळला जाणार नाही, ही खात्री वाटली तर कामगार आनंदाने नाचत वाटेल तितका श्रमेल. परंतु जोवर गरिबांची होते होळी, बडयांची पिकते पोळी, हे त्याला दिसत आहे तोवर त्याचा जीव अधिक उत्पादनात संपूर्णतया कसा रंगेल ? एवंच आर्थिक समता दूर आहे.
आणि सामाजिक समता ? जोवर शिक्षणाने, राहणीने, संस्कृतीने सारे थर समान पातळीवर येत नाहीत तोवर सामाजिक विषमता तरी कशी दूर होणार ? सा-या जातीपाती समान माना म्हणून म्हटले तरी जिच्या केसाला तेल नाही, जिचे नेसू चिंधी अशी कातकरीण स्वच्छ इरकली पातळ नेसलेल्या, वेणीफणी केलेल्या भगिनीजवळ कशी बसणार ? तिला बसू कोण देणार ? बिहारमध्ये चंपारण्यांत गांधीजी गेले. कस्तुरबांना म्हणाले, ' भगिनींना स्वच्छता शिकव. ' एक भगिनी कस्तुरबांना म्हणाली, 'आंग धुतले तर दुसरे नेसू काय ?' सामाजिक विषमता नष्ट करायलाही आर्थिक विषमता दूर करावी लागते. धार्मिक विषमता दूर करण्यासाठी सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचा प्रचार करणे, कोणत्याही धर्माचा असो तो लायक असेल तर त्याला कामावर घेणे, भेदभाव न करणे या गोष्टी हव्यात.
स्वराज्यातील चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अहिंसक रीतीने सरकारला विरोध दाखवण्याची मोकळीक असणे. गांधीजी म्हणत, ' आय ऍम द ग्रेटेस्ट डेमोक्रॅट - मी सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. ' परंतु आज काय आहे ? सरकार लोकशाहीचे पुरस्कर्ते असते तर येताजाता कार्यकर्त्यांना अटक ना करते, त्यांच्या मार्गात अडचणी ना आणते. परंतु सेवादलाचे ' बिजली नाचेल गगनात ' हे सुंदर नृत्यगीत पाहून एका मंत्र्याने म्हणे कपाळाला आठया घातल्या ! ' सेवादलात गाणे कशाला ? ' असे म्हणाले ! पु.विनोबाजींनी धुळयाला सेवादलाच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहून संतोष दर्शवला व ' खेडयापाडयांतून जा असे कार्यक्रम करत ' असे सांगितले.
केवळ कायद्यने जनतेची हृदये का मिळत असतात ? दुस-या पक्षाला विधायक सेवाही करू द्यायची नाही ! त्यांच्या नावावर सेवेचे भांडवल उगाच जमा व्हायला नको. 'आमच्या प्रौढ साक्षरता वर्गांना मंजूरी मिळत नाही मग मदत कोठून मिळणार ?' असे एक कार्यकर्तां म्हणाला.
बर्नार्ड शॉने एके ठिकाणी सत्ताधा-यांना उद्देशून म्हटले आहे - 'इफ यू वॉन्ट ब्लड यू वुइल हॅव इट. हेंव युवर ओन चॉइस - तुम्हाला रक्ताचेच डोहाळे हवे असतील तर तीही तुमची इच्छा पूर्ण होईल !' रक्तपात नको असेल तर त्वरेने जनतेचा संसार नीट उभा करायला हवा.
दरिद्रनारायणा, तुला सुखवणारे स्वराज्य दूर आहे. ते जवळ यावे म्हणून निर्मळपणाने जे संघटना करू पाहतात, जे लोकशाही मार्गाने जाऊ इच्छितात त्यांच्या वाटेत निखारे पेरले जात आहेत. परंतु गांधीजींनी दिलेली श्रध्दा घेऊन आपण जाऊ. जय की पराजय हा सवाल नसून सारे सहन करत न दमता, न थकता उत्कटपणे काम करणे एवढेच आपल्या हाती.
साधना : फेब्रु. ५, १९४९