आणि त्या कुमाराची कोणती प्रतिज्ञा होती ? मराठीच्या प्रांतात ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती आणि या प्रतिज्ञेचा हेतु काय होता ?
जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात
या ध्येयासाठी त्यांना ब्रह्मविद्येचा सुकाळ करावयाचा होता. ब्रह्मविद्येचा 'थोर विचार' असा मी अर्थ करतो. ब्रह्म म्हणजे मोठी वस्तू. क्षुद्रवस्तूंचे विचार त्यांना नको होते मोठे विचार मांडून समाजातील विषमता, अन्याय, पाप यांचा अंधार त्यांना दूर करायचा होता. प्रत्येकाला कर्तव्याचा पंथ दिसावा म्हणून त्यांची खटपट होती. स्वधर्मा-प्रमाणे वागणे म्हणजे स्वत:तील गुणधर्मांचा विकास करून तद्द्वारा समाजाची सेवा करणे. परंतु विकास होण्यासाठी समाजात वाव हवा. तेथे समता हवी, स्वातंत्र्य हवे. तेथे मोठे विचार हवेत. बंधु-भाव हवा. आणि असे होईल तरच सर्वांना आवश्यक ते सारे मिळेल. ददात रहाणार नाही. समाजातील जीवनात ब्रह्मविद्या असेल तर कोणी दरिद्री, दु:खी, शोषित राहणार नाही.
मित्रांनो, ज्ञानदेवांनीच तुम्हाला दिव्य मार्गदर्शन केले आहे. समाजात ब्रह्मविद्येचा सुकाळ करून दु:खदैन्य दूर करा आणि सर्वांचे संसार सुखी होतील असे करा. तर मग तुम्ही या ध्येयाहून कमी प्रतीचे ध्येय डोळयांसमोर ठेवणार का ? उपनिषदात म्हटले आहे,
भूमी एवं सुखं अल्पे सुखमस्ति
मोठया वस्तूंत सुख आहे. क्षुद्र वस्तूंत सुख नाही.
आज उपासना करून, अभ्यास करून, तपश्चर्या करून जे साहित्य उद्या तुम्ही निर्माल ते मोठया गोष्टींना प्रकट करू दे. आजही ब्रह्मविद्येचा सुकाळ हवा आहे. मराठी वाङमयात उदात्त विचारांचा, उदार भावनांचा भरपूर पाऊस पडायला हवा आहे. त्यात शास्त्रीय दृष्टीचा रंगही मिसळा. तुम्ही तुमच्यासमोर हे असे मोठे ध्येय ठेवा.
समाजाला सुखी करायचे आहे ना ? तुमची कला आनंदासाठी ना आहे ? तर मग माझे सांगणे असे की, त्याच्या जीवनात आनंद रहावा म्हणून तुम्ही मुळाशी हात घाला. उपाशी माणसाला दोन बिस्किटांनी समाधान होणार नाही. त्याला नेहमी भरपूर भाकर मिळायला हवी.