इतिहासात अनेक प्रवाह, अनेक चळवळी प्रथम अलग सुरू होतात. मग त्या एकात एक मिसळून एक महान प्रवाह होतो. कधी तो प्रवाह मग एखाद्या महान विभूतीत दिसू लागतो. अर्वाचीन भारतीय इतिहासात शिक्षणसुधारणा, स्त्रीसुधारणा, सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, अस्पृश्योध्दार, हिंदू-मुस्लिम ऐक्य, आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा अशा अनेक चळवळींचे प्रवाह अलग अलग सुरू झाले. परंतु हे सारे प्रवाह एकत्र होऊन राष्ट्रसभेचा महान प्रवाह निर्माण झाला आहे आणि हे सारे प्रवाह महात्माजींच्या महान व्यक्तिमत्त्वात आज एकत्र झालेले आपणास दिसतात. महात्माजी म्हणजे आजचे भारतीय युग. आणि या युगात राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक सर्वच प्रवाह मिसळले आहेत. हे महायुग आहे. एखादे युग धार्मिक असते, एखादे राजकीय, एखादे सांस्कृतिक; परंतु आजच्या भारतीय युगात ही सारी युगे एकदम जन्मली आहेत-एकात एक मिसळली आहेत.

अशा या युगाशी तुम्हाला एकरूप व्हायचे आहे. जीवनाची पूर्णता अनंतात आहे. तुम्ही एकटेच खोलीत बसून स्वत:च्या जीवनाचे धागेदोरे विणीत नका बसू. कृत्रिम, काल्पनिक जाळी नका विणू. तुमचा आत्मा सभोवतीच्या विराट जनतेच्या आत्म्याला भेटवा. विशाल सहानुभूतीशिवाय थोर सारस्वत संभवणार नाही. तुमची आजची स्फूर्तिसुध्दा सामुदायिक होवो. सर्वांची स्फूर्ती तुमच्याद्वारा प्रकट होवो. तुमचा उद्गार म्हणजे जनतेचा उद्दार, तुमचे गान म्हणजे ४० कोटींचे वृंदगान! 

कोणतीही कला सोपी नाही. तेथे साधना लागते. तपेच्या तपे द्यावी लागतात. कला म्हणजेच पूर्णता कला परिपूर्णतेची अपेक्षा करते. खूप वाचा, उत्तमोत्तम नमुने वाचा. प्राचीन वागीश्वर वाचा, अर्वाचीन वाग्भट अभ्यासा. प्रतिभावान नाटककार आणि थोर कवी गोविंदाग्रज यांना मोरोपंतांच्या पाच हजार ओव्या पाठ येत होत्या. मुक्तेश्वर म्हणतो 'एकेक अक्षराची भीक' मागून मी हे लिहीत आहे. स्वभाषेतीलच नव्हे तर परभाषेतीलही वाङमय अभ्यासा. ज्ञानाच्या क्षेत्रात सीमा सरहद्दी नाहीत. सारे जागतीक वाङमय तुमच्यासमोर आहे. महान साहित्यिक हा मोठा चोर असतो. वडाचे झाड दूरवर पाळमुळे पसरून ओलावा घेते. महान साहित्यिक सारे काही घेऊन स्वत:च्या भावनांच्या मुशीत घालून आपल्या वैशिष्टयाचा नि व्यक्तिमत्त्वाचा ठसा-जिवंत ठसा त्यावर मारीत असतो. केवळ स्वयंभू असे जगता काही एक नाही. शेक्सपिअरने अनेक जुनी कथानके घेतली; परंतु त्याने कोळसे घेऊन त्यांचे हिरे केले. कालिदासाने महाभारतातून शाकुंतल घेतले. परंतु नवीनच अभिनव वाग्विलास त्याने करून दाखविला. रवींद्रनाथांवर उपनिषदे, कबीर यांचा अपार परिणाम झालेला आहे.

थोर ग्रंथांचे अध्ययन करा. परंतु तेवढयाने भागणार नाही. जीवनग्रंथांचा खोल अभ्यास करा. प्रत्येक प्राणी म्हणजे विश्वग्रंथाचे पान आहे. प्रत्येक जीवन म्हणजे महाकाव्य आहे. ही जीवने तपासा. मुंबईच्या चाळीतून जा. दहा हात लांबीरुंदीच्या खोलीत सहा सहा कुटुंबे कशी राहतात ते पहा आणि साहित्यिक असाल, तर असा आगीचा डोंब पेटवा की ज्या समाजरचनेत हे शक्य होते. ती भस्म होईल. जा, शेतक-यांची जीवने तपासा. खंडोगणती धान्य पिकवणारे दैवाचे शेतकरी दुर्दैवी का ? ही धरित्रीची लेकरे उपाशी का ?  त्यांच्या मुलांना दोनदोन दिवस काकडीवर, आठआठ दिवस आंब्याच्या कोयांवर, काही दिवस चिंचोक्यांवर रहायची पाळी का ?  साहित्यिक म्हणजे सहानुभूतीचा सागर. ज्यामानाने तुमची सहानुभूती मोठी त्यामानाने तुम्ही मोठे साहित्यिक. तुमच्या सहानुभूतीची लांबी-रुंदी कोठवर पोचते ते पहा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel