परंतु तुम्ही असे नका होऊ. जिकडून जे घेता येईल, ज्याच्यापासून जे शिकता येईल, ते आदराने घ्या आणि वाढा.

अशी तयारी तुम्ही करा. अशी तयारी करीत असतांनाच लिहिण्याची संवय ठेवा. मनात भावना, विचार जमले आहेत असे वाटले की लिहा. फुलायच्या आधी कळी फुगीर दिसते; आत गंध नि रंग इतक भरतात की, शेवटी पाकळयांना कळा लागून सारे विकसन प्रकट होते. तसे तुमचे होवो. उत्तरोत्तर अधिकाधिक सामर्थ्य येईल, आत्म-विश्वास येईल.

मी तुम्हाला आता प्रत्यक्ष कार्याची कल्पना देणार आहे. तुम्ही सारे कुमार साहित्यिक आहात. कुमार साहित्याचा द्विविध अर्थ होईल. कुमारांसाठी लिहिलेले साहित्य, कुमारांनी लिहिलेले साहित्य. आणि उद्या हातून सुंदर साहित्य निर्माण व्हावे म्हणूनसामुदायिक प्रयत्न करणारे हे तुमचे मंडळ. तुमचे असे हे त्रिविध स्वरूप आहे.

कुमारांसाठी मराठीत फारसे साहित्य नाही. जीवनातील अनेक गोष्टींना स्पर्श करणारे बालसाहित्य, विश्वाची कल्पना देणारे साहित्य मराठीत नाही. मुलांसाठी केवळ गोष्टी नकोत. त्यांचा उपयोग नाही असे नाही. त्यांतून त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या भावनांना सुंदर वळण लागते. त्यांची कल्पनाशक्ती जागी होते. असा पुष्कळ उपयोग आहे. परंतु विसाव्या शतकातील जीवनाचे एवढयाने संवर्धन होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लहानपणात या अडचणी भासल्या असतील. तुमची लहान भावंडे पुस्तके द्या म्हणून पाठीस लागतात. आपणास अडचण पडते. आहेत कोठे पुस्तके ? कुमारांसाठी अनेक विषयांवरची हजार तरी पुस्तके तयार करायला हवी आहेत. शिक्षक, प्राध्यापक, लेखक सर्वांचे सहकार्य हवे. सरकारी मदत हवी. जर्मनीत १९१४ पूर्वी मुलांच्यासाठी एकेका शास्त्रीय विषयावर पाऊणशे पाऊणशे छोटी पुस्तके केली गेली होती. वनस्पतींवरची, ता-यांवरची, इंजिनांवरची. मोठमोठी चित्रे, त्यात नाना भाग, रंग. मुलांची जिज्ञासा वाढायला हवी. आनंदाचे आद्य संपादक वासुदेव गोविंद ह्यांनी का व कसे अशा शास्त्रीय माला निर्मिल्या होत्या, हे शास्त्रीय ज्ञान द्यायला हवे. तसाच इतिहास.  मुलांना एकदम जागतिक इतिहास शिकवावा. जगाचे नागरिक त्यांना बनवावे. समुद्रातील लाट ज्याप्रमाणे दुरून वाढत येते त्याप्रमाणे जागतिक इतिहासातील विचारलाटा दोन-दोनशे वर्षे वाढत येतात. जागतिक जीवनात दोनशे वर्षे म्हणजे दोन दिवसच होत. तो पहा अती प्राचीन काळ. तेथे इजिप्त, बाबिलोन, मोहेंजोदारो या सर्व प्रदेशांत एक संस्कृतीची महान लाट आलेली दिसते. दाखवा ती मुलांना. दाखवा तिच्यातील रंग. नंतर ती पहा २५०० वर्षापूर्वीची दुसरी वैचारिक लाट. तिकडे ग्रीस देशात सॉक्रेटीस, प्लेटो, येथे भगवान बुध्द नि महावीर. चीनमध्ये ला ओत्सी नि कन्फ्यूत्सी. दाखवा मुलांना त्या लाटेचे रंग, उंची नि भव्यता. ती पहा पंधराव्या सोळाव्या शतकातील धर्मसुधारणेची लाट. युरोपात ल्यूथर वगैरे, हिंदुस्थानात साधुसंत. त्यांच्या पुढची स्वातंत्र्याची लाट पहा. जगात सर्वत्र स्वातंत्र्याचे लढे. अशा रीतीने मुलांना  जागतिक लाटांवर  नाचवावे. मग पुढे वाढत्या वयाबरोबर अधिक रंग त्यात भरावे. हे इतिहास; त्याप्रमाणेच सर्व प्रकारच्या थोरांची चरित्रे - धगधगीत नि जळजळीत, ठसठशीत नि प्रासादिक. मुलांच्या पुस्तकांत नुसती बोध-भाषा नसावी. विनायक कोंडदेव ओक यांनी बालबोध मासिक पूर्वी चालविले. त्यांची भाषा सुबोध असे. परंतु त्यात प्रसाद नि मधुरता नसे. मुलांची जीवने छंदोमय असतात. पाऊस पडत आहे हे वाक्य त्यांना आवडणार नाही. पाऊस झिमझिम पडत होता. वारा भिरभिर करीत होता. तारे चमचम करीत होते. ओढा खळखळ वहात होता. असे त्यांना आवडते. मुलांच्या जीवनातील संगीत कळल्याशिवाय मुलांच्या हृदयाची पकड घेणारे वाङमय लिहिता येणार नाही. त्यांना ता-यांची, वा-यांची, वनस्पतींची, रसायनशास्त्राची, विद्युतशास्त्राची, सर्व सृष्टीची माहिती द्या, ती क्लिष्ठ नको.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel