म्हणून माझ्या मित्रांनो, तुम्ही दरिद्री नारायणात मिसळा. त्यांचे संसार पहा. तेथील प्रश्न अभ्यासा तेथील दृश्ये पहा. अन्याय, जुलूम, व्यसने, उपासमार, अज्ञान-सारे पहा, आणि त्यांचे अमर ठसे उमटवून घेऊन त्यातून जिवंत साहित्य निर्माण करा. हे क्रांतीचे, प्रगतीचे युग आहे. व्यक्तिगत स्फूर्तीला सामुदायिक करून सर्वांच्या मनोबुध्दीभोवती असणारी बंधने तोडा. त्यांना ती दाखवा. तोडायला सांगा आणि स्वसामर्थ्यांची जाणीव झालेले हे कोटयवधी बंधू क्रांतीकडे, नवसमाज-रचनेकडे ज्ञानविज्ञानाची तेजस्वी जाणीव घेऊन निघू देत. हा ज्ञान- विज्ञानाचा संदेश भावनेच्याद्वारा तुम्ही पोचवा. काय गाळावे नि काय ठेवावे हे कला जाणते. कलाबिला मला फारशी कळत नाही. परंतु या अर्थाचे एक वाक्य मी वाचले होते. कोणाचे चित्र रंगवावे, कोणाचे रंगवू नये हे कळले तरी पुरे. महत्त्वाचे असेल ते ठेवायला हवे. ज्याचे महत्व नाही त्याला दूर फेका. समाजात महत्वाचा वर्ग कोणता ? कोणाला पुढे आणायचे, कोणाची प्रतिष्ठा वाढवायची ? हे ज्याला समजले त्याला मी सामाजिक कलावान म्हणेन.
तुम्हाला आजचे जीवन तपासायला मी सांगत आहे. त्यातील सा-या दुष्ट, भ्रष्ट गोष्टींवर हल्ले चढवायला सांगत आहे. तुम्ही आजकालचे व्यापक जीवन खोल जाऊन अभ्यासाच. केवळ पुस्तकांतून नव्हे तर प्रत्यक्ष हिंडून, फिरून, मिसळून. परंतु त्याच्याबरोबरच जुना इतिहासही वाचा. महाराष्ट्र, भारतवर्ष, यांचा इतिहास अभ्यासा. त्यातून तुम्हाला नवीन दृष्टी मिळेल. भारताच्या दहा हजार वर्षाच्या इतिहासातील गतिनियम कळतील. तुमचा आत्मा आजच्या जीवनाशी मिसळाल, त्याचप्रमाणे हजारों वर्षे क्रान्त-उत्क्रान्त होत असलेल्या भारतीय आत्म्याचीही भेट घ्या. पंडीत जवाहरलालांनी ' भारताचा शोध ' म्हणून महान ग्रंथ नगरच्या स्वातंत्र्यमंदिरात लिहिला. भारताच्या अखंड विकासमान आत्म्याची अनंत कालाखंडातून हिंडून त्यांनी भेट घेतली. जुने इतिहास, परंपरा, दंतकथा, आख्यायिका या सर्वांचा अभ्यास हवा. खूप खाद्य मिळते. एखाद्या गोष्टीतून एकदम महान अर्थ सापडतो. परवा विनोबाजी म्हणाले, 'विराट पुरुषाला हजारो डोकी, हजारो हात असे वर्णन आहे. परंतु हजारो हृदय असे मात्र म्हटलेले नाही. हृदय एकच. तुम्ही कोटयवधी भारतीय एका हृदयाचे व्हा.' केवढा थोर विचार या प्राचीन मंत्रातून त्यांना मिळाला. वेद, रामायण, महाभारत, उपनिषदे, शेकडो अख्यायिका, गोष्टी तुम्हास माहित नसतात. असे नका करू. या सारस्वतसागरात मधूनमधून बुडया मारीत जा. कल्पनांचे तेथे अपार भांडार आहे.
हे सारे जुने काल्पनिक इतिहास, खोटया दंतकथा कशाला असे म्हणू नका. एका अर्थाने आपणही सारे काल्पनिकच आहोत. आपण म्हणजे क्षणभंगूर बुडबुडे, मृगजळे. आता आहोत. दुस-या क्षणी नाही. परंतु क्षुद्र असूनही आपणास महत्व का ? क्षणभंगूर असून आपण चिरंजीव आहोत. का ? तर आपण लहानमोठे सारे कशाची तरी प्रतीके असतो. आपले जीवन म्हणजे काही विचार, काही ध्येये, यांची पूजा. आपल्या कृतीतून काहीतरी सत्य आपण प्रकटवीत असतो. त्या सत्याची, त्या दिवसेंदिवस वाढत जाणा-या नि वाढत आलेल्या विचारांची, ध्येयाची आपण प्रतीके असतो. आणि आख्यायिका, दंतकथा, परींच्या गोष्टी यातील ती काल्पनिक पात्रे, पशुपक्षी, सारी सत्याची प्रतीके असल्यामुळे त्यांना तुच्छ नका मानू.