सर्व भारताच्या रूपाने मला नटू दे. सा-या भाषा माझ्या, सारे भाऊ माझे, माझे मोठे कुटुंब आहे. लाखांचे हे तुटपुंजे राष्ट्र नाही. कोटयावधींचे ते आहे. मग मोठया कुटुंबावर जबाबदारी अधिक. शिका दोनचार भाषा. प्रांतांच्या सीमेवरचे भाग तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका.
प्रांतांनी भारती व्हावे आणि भारताने अति भारती व्हावे. महात्माजी उर्दू लिपी शिका म्हणत. अरे त्या महापुरुषाची दूरदृष्टी आहे तुमच्याजवळ? एकीकडे आशियाचा संघ करा म्हणता. ईजिप्तपासून तमाम मुस्लिम राष्ट्रांची जी अरबी लिपी. फक्त तुर्कांनी रोमन लिपी घेतली. या सर्व देशाचे विचार कळायला त्यांची लिपी नको यायला ? त्या भाषा नको कळायला ? या सर्व मुस्लिम देशांचे राजकारण वा अर्थकारण अमेरिकेच्या वृत्तपत्रांवरून का आपण वाचणार, समजून घेणार? हिंदु, मुस्लिम कोटयावधी आहेतच. त्यांच्यासाठी शेजारधर्म म्हणून आणि आशियातील मुस्लिम राष्ट्रांचे हृद्गत कळावे म्हणून अरबी लिपी शिकणे आवश्यक आहे. युरोपातील लोक अनेक भाषा शिकतात. झेक राष्ट्रांत हिंदीचे वर्ग चालतात. काय त्यांना जरूर ?
म्हणून आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नये. व्याप वाढवाल तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा. सारे प्रांत प्रेमस्नेहाने एक-मेकांजवळ वागोत. भारताचे एक हृदय असो. प्रांत एकजीवी असोत. आंतरभारती आणि विश्वभारती अशी आमची दोन ध्येये आहेत. ते थोर पूर्वज म्हणाले, 'कृण्वन्तो विश्वमार्यम्.' आपण सर्व विश्वाला आर्य म्हणजे उदार सुसंस्कृत करू. म्हणून चिनी भाषा शिकून त्या भाषेत आपल्या प्राचीन पंडितांनी ग्रंथ लिहिले. विनोबाजी अरबी शिकून मुसलमानांना कुराणाचा महिमा आज सांगत आहे. प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध, याला आपण आन्तरभारती ध्येय म्हणू. दुसरे रवींद्रनाथांनी उद्धोषिलेले विश्वभारतीचे. भारताचा सर्व जगाशी संबंध ठेवणे. असे हे संबंध, संयम नि सहानुभूती, विशाल व थोर दृष्टी ही असतील तरच निर्माण होतील.
साधना : ऑगस्ट २१, १९४८