जनतेचा संसार सुखाचा करायचा तर शासनसंस्थाही जनतानुकूल हवी. जनतेच्या जीवनाचा कोंडमारा होत असेल तर कोठून प्रगती ? शासनसंस्थाच नसावी. सारा मानवसमाज सहकारी तत्त्वावर चालावा असे त्यांना वाटे. परंतु ते अराजकसहकारी युग कधी येईल ते येवो, तोवर लोकशाही सत्ता तरी हवी. हुकुमशाही, साम्राज्यशाही नको. म्हणून महात्माजी राजकारणी झाले; परंतु तेथेही निर्मळ साधने घेऊन ते उभे राहिले. सर्वांना निर्भय केले. असत्याशी, अन्यायाशी असहकार करा म्हणून म्हणाले. त्यांनी नि:शस्त्र जनतेला निर्भयतेचे व्यावहारिक शस्त्र दिले. जगातील निशस्त्र जनता मार्ग शोधीत होती. तिला गांधीजींनी कायदेभंग, करबंदी, राष्ट्रव्यापक संप, अशा आविष्कारात सत्याग्रह दिला. ते प्रयोग त्यांनी जन्मभर केले. जगाच्या इतिहासात एक नवीन दालन उघडले. दहा हजार वर्षानंतर एक नवीन प्रयोग त्यांनी सुरू केला. हा त्यांचा सर्वात महत्वाचा अवतार.
आज मानवसमाज जवळ आला आहे राष्ट्रे जवळ आली आहेत. क्षणात जगातली वार्ता कळते. अशा वेळेस सर्वांविषयी प्रेम हवे, बंधुता हवी. अनेक धर्म, संस्कृती मानवणारे मानववंश एकत्र येणार. भारताचे तर हे वैशिष्ठयच आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी हिंदुधर्माचे युगधर्म-रूप दाखविले. विवेकानंदांनी शिकागोला 'युनिव्हर्सल रिलीजन' विश्वधर्म हिंदुधर्मच होऊ शकेल असे सिध्द केले. याचा अर्थ इतर धर्मियांना हिंदू करणे नव्हे. तर इतर धर्मांनीही उदार होणे. सर्वधर्म मुळात बंधुता, विश्वकुटुंबता शिकवतात. महंमद म्हणाले, 'अरबांनो, मी तुम्हाला धर्म देत आहे. इतरांना इतरांच्या द्वारा प्रभूने धर्म दिला असेल. सर्व धर्मांना मान द्या. 'ही गोष्ट शिकायची आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे सर्वधर्म-ममभाव. म्हणून रामकृष्ण परमहंस चर्च, मशीद सर्वत्र जाऊन साक्षात्कार घेते झाले. तीच परंपरा महात्माजींनी पुढे नेली. ते सर्व धर्माच्या प्रार्थना म्हणत. दिल्लीला कुराणातील प्रार्थना म्हणायला काही श्रोते विरोध करीत. गांधीजी त्यांना समजावून सांगत. खांडव्याच्या एका मंदिरात विनोबांच्या हस्ते सर्व धर्माचे ग्रंथ ठेवण्यात आले. विनोबाजी कुराण शिकले. महात्माजींनी दिलेली ही थोर शिकवण आहे.
यातून हिंदू-मुस्लिम ऐक्य ते करीत राहिले. हिंदुस्थानात कोटयवधि मुसलमान. पाकिस्तान झाले तरीही हिंदी संघराज्यात मुसलमान आहेतच. म्हणूनच आपण एकत्र राहण्याचा प्रयोग करीत राहिले पाहिले. तो न करता आला तर जीवनाला अर्थ तरी काय ? सर्वांना एकत्र नांदण्याचाच प्रयोग भारत करीत आला. महात्माजींनी तोच प्रयोग पुढे चालवला. यासाठीच त्यांनी एकवीस दिवसांचा उपवास केला. यासाठीच पुन्हा जीवनाच्या अखेरीत त्यांचे दोन उपवास. याचसाठी त्यांचे महान बलिदान! महात्माजींचा हा दुसरा अवतार.