खालचे वरचे सारे विश्व पहा. आकाशातील रात्रीचे काव्य पहा. श्री. काकासाहेब कालेलकरांचा हा जीवनाचा आनंद आहे. तो तुमचाही होवो. वेदांतील ऋषींनी मध्यान्हीच्या निळया निळया आकाशाचेही वर्णन केले आहे, आम्ही पहाटेचेही पाहाणार नाही ; मग मध्यान्हीचा धगधगीतपणा नि त्यातील प्रखर सौंदर्य पाहणे दूरच राहिले. तुम्हाला ता-यांचे कधी आकर्षण वाटले आहे ? निळया आकाशाने कधी तुम्ही वेडे झाला आहात ? जव्यांची कवाईत पाहिली आहे-प्रकाशाची कवाईत ?

एखाद्या डोंगरावर बसावे. समोर अनंत क्षितिज असावे. आपल्या मनाला ही सारी सृष्टी विशाल पाळण्यांत घालून नाचवित आहे असे वाटते. या अनंत सृष्टीत मी वाढत आहे, अनंत होत आहे असे वाटते. अरबस्थानातील रात्रीच्या वेळच्या अनंत, नि:स्तब्ध आकाशाचेच पैगंबरांच्या तोंडून कुराण वदविले. भारतीय सरितांनी, पर्जन्यधारांनी, वनांनी, वेदोपनिषदांना जन्म दिला. रवींद्रनाथ निसर्गाजवळ शिकले. निसर्गातील गंध, रंग, प्रकाश त्यांनी लुटला आणि गीतांजलीत 'प्रकाश, प्रकाश अनंत प्रकाश असे म्हणत एका गानांत जणू ते नाचत आहेत असे वाटते. बालपणात त्यांनी वडिलांबरोबर हिमालयाचे अपार सौंदर्य नि उदात्त गांभीर्य प्राशन केले. पुढे मोठेपणात पद्मानदीच्या विशाल प्रवाहात ते चार चार महने बोटीत बसून जीवन नेत. वारे, लाटा, पक्षी, आकाश, अस्तोदय, सर्वांच्या संगतीत रहात. त्यांच्या काव्यात हा सुगंध नि ओलावा आहे.

सृष्टीच्या अंतरंगात शिरा. तुम्हाला तेथे अनंत वाणी ऐकू येईल. एकदा रवींद्रनाथ सायंकाळी फिरायला बाहेर पडले. तो वादळ उठले. वृक्ष नाचू लागले. धुळीचा बुक्का, गुलाल उधळला जाऊ लागला. विराट नाच सुरू झाला. रवींद्रनाथ स्वत:ची रेशमी कफनी विसरून धुळीत बसले. त्यांचे हृदयही नाचू लागले. पुढे वादळ शांत झाले. रवींद्रांनी डोळे उघडले. लगेच एक अमर गीत लिहून सायंप्रार्थनेत त्यांनी ते म्हटले.

सृष्टीचे हे महान गान तुम्हाला एकदम ऐकू येणार नाही. सृष्टीशी परिचय वाढवा, प्रेम वाढवा, तुम्हाला तिची अनंत भाषा, अनंत छंद मग सारे कळू लागेल. जरा पहाटे उठत जा. बाहेर पडा. वारा अंगाला लागू दे. तृणपर्णे पहा. तांबडे कसे काय फुटते, प्रकाश कसा कसा येतो. पहा. जीवनाला मंगल असे प्रात:स्नान होईल. अमेरिकन ग्रंथकार-तो निसर्गप्रेमी थोरो म्हणतो, 'दोन तास शेतात काम करा. तुमची सारी पोटदुखी जाईल. तुमच्या लिहिण्यात तेज, तजेला, नवजीवन येईल.'  आज सृष्टीपासून आपली फारकत झाली आहे. तुम्ही अजून नवीन आहात. तुम्ही ही चूक करू नका. जिज्ञासा, कौतुकवृत्ती यात साहित्याचा आत्मा आहे. प्रत्येक वस्तूजवळ जाणे, तिला बघणे, तिच्याजवळ बोलणे - यातील गंमत तर पहा. तुम्ही झपाटयाने वाढत जाल.

अशा रीतीने अनेक अनुभव घ्यावे. जीवन अनुभवाने समृध्द करावे. सृष्टीच्या सान्निध्यातील अनुभव, मानवी जीवनातील अनुभव. शेतकरी व्हा, कामगार व्हा. बघा ते जीवन. आणि वादळात फिरायला जा. उंच डोंगर चढा. द-यात उतरा. सागरात डुंबा. एका चिनी चित्रकाराची गोष्ट आहे. वादळात, मुसळधार पावसात समुद्र कसा दिसतो ते त्याला पहायचे होते. तो समुद्रात कित्येक तास उभा होता, सभोवती वारे, लाटांचे तुषार नि फेस यांची अंगावर वृष्टी होत होती. वरून मुसळधार पाऊस आणि तो चित्रकार लाटांत सारखा उभा होता. सर्वांगाचे डोळै नि कान करून पहात होता, ऐकत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel