शास्त्रीय असून सोपी नि गुदगुल्या करणारी अशी ही पुस्तके हवीत. ही केवळ क्रमिक पुस्तक नसावीत. आबाल स्त्री-पुरुषांना खेडयापाडयांतून समजतील अशीही हवीत. हे प्रचंड कार्य आहे. तुमच्या या मंडळातून उद्या कुमारांसाठी असे वाङमय निर्माण करणारे उभे राहोत. आजपासून ठरवा. मी हे लिहीन. तू ते लिही. वीस वर्षांनी मराठीत एक हजार पुस्तके विविध विषयांवरची सोपी, सुटसुटीत अशी निर्माण करा. महाराष्ट्राचे तुम्ही पांग फेडाल. अनाथ विद्यार्थी गृहाची स्वाध्यायमाला अशा प्रकारचे थोडे कार्य करीत आहे.

ही पुस्तके सोपी असून स्वस्त हवीत. एकदा पुज्य विनोबाजी म्हणाले,' लिहून पैसे मिळविणे पाप. श्रमाने पैसे मिळवा. पुस्तकाचा खर्च भागेल इतकीच किंमत ठेवा. ज्ञान विकू नका. 'मी श्यामची आई-२५० पाने, सुंदर तिरंगी चित्र-प्रथम १९३५ मध्ये 1 रुपयाला ठेवली. माझ्या कवितांचे ४२५ पानांचे 'पत्री' पुस्तक-त्याची दीड रुपया किंमत ठेवली होती. परंतु पुढे मला सार्वजनिक कामासाठी, अनेक स्नेह्या-सोबत्यांसाठी पैशाची ददात पडे. श्रीमंताजवळ मागायला संकोच आणि आमची पतही नाही. कारण भांडवलशाहीला आम्ही उखडू पाहणारे. तेव्हा पुस्तक एवढेच साधन राहिले. जास्त पैसे देणारा प्रकाशक गाठावा. मग त्याने अधिक किंमत ठेवली तरी बोलता येत नसे. मी लाचार आहे. मला याचे वाईट वाटते. मला अनेक खेडयांतील मित्र म्हणतात, 'गुरुजी, तुमच्या पुस्तकाची किंमत फार.'  मी त्यांना माझी अडचण सांगतो.

मित्रांनो, तुम्ही काहीतरी अशी योजना करा की पुस्तके स्वस्त देता येतील. तुमची उपजीविका त्यातून नका अपेक्षू. अर्थात हा ध्येयवाद झाला. जमेल तसे करा.

दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रभर हिंडून सारे परंपरागत वाङमय गोळा करा. मी एका खेडेगावात काही दिवस राहत होतो. तेथील वृध्द बाप्पाजी म्हणाले, 'आज मी गोष्ट सांगतो.'  त्यांनी गोष्ट सुरू केली. दोन-तीन दिवस ती गोष्ट चालली होती. आपल्याकडे पूर्वी छापखाने नव्हते. इंग्रजीत well-read ' पुष्कळ वाचलेला 'असा शब्द आहे. आपल्याकडे 'बहुश्रुत' असा शब्द आहे. परंपरागत तोंडोतोंडी वाङमय येई. लोक ऐकत. कहाण्या, ओखाणे, ओव्या, गाणी, पोवाडे, गोष्टी सारे तोंडी असे. वाङ्मयाशिवाय समाज जगू शकत नाही. ते साहित्य आज नष्ट होत आहे. तुम्ही सारे गोळा करा. जावे एखाद्या गावात. दवंडी द्यावी. जो गोष्ट सांगेल त्याला चार आणे, आठ आणे देऊ. अशा रीतीने सर्व प्रकारच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा गोळा करा. जर्मनीतील ग्रीम बंधूंनी बारा वर्षे हिंडून अशा गोष्टी गोळा केल्या. त्या गोष्टी जगातील मुलांना आनंदवित आहेत. आपल्या महाराष्ट्रातील ग्रीम् बंधू केव्हा उत्पन्न होणार ?  तुम्हाला एक खानदेशी लोककथा सांगू ?

एका गावातील एका बाईला एक मुलगा होता. पुढे ब-याच वर्षांनी तिला दुसरे मूल झाले. परंतु ते मूल म्हणजे साप होता. त्याला नाग्या म्हणत. नाग्या घरात हिंडे-फिरे. मोठया भावावर त्याचे अपार प्रेम. भावाबरोबर शेतावर जाई. वेटोळे करून बसे. भावाबरोबर दूध पिई. भाऊ गाणी म्हणवून त्याला निजवी. एकदा मोठया भावाला परगावी जरा लांब जायचे होते. तो नाग्याला म्हणाला, 'नाग्या, मी लौकर येईन. दूध पीत जा. उपाशी राहू नको. मी आठा दिशी परत येईन. '  भाऊ गेला, नाग्या दिवस मोजीत होता. आठ दिवस झाले. भाऊ परतला नाही. नाग्या जेवेना, दूध पिईना. आई म्हणाली, 'नाग्या, असे किती दिवस करणार ? जा नाहीतर, आण भावाला शोधून.'  नाग्या खरेच बाहेर पडला. रस्त्याचे बाजूने चालला. रात्र झाली. नाग्या जात होता. भ्रातृचिंतनात मग्न होता. तिकडून एक बैलगाडी येत होती. नाग्याला भान नव्हते. गाडी अंगावरून गेली. नाग्या चिरडला गेला. त्या गाडीत तो मोठा भाऊ होता. गाडी घरी आली. भाऊ घरात गेला. नाग्या दिसला नाही. भावाने विचारले, 'आई, नाग्या कोठे आहे ? झोपला वाटते ?' 'नाही रे, तुलाच शोधायला गेला. घरी खाईना, पिईना.' भाऊ नाग्याला शोधीत निघाला तो वाटेत नाग्या चिरडलेला दिसला. भाऊ रडला. पुढे तेथे त्याने नागाची एक दगडी मूर्ती करून बाजूला बसविली. रोज तेथे दुधाचा नैवेद्य आणून तो दाखवी. ती दगडी मूर्ती अजूनही डॉ. उत्तमराव पाटील - क्रांतिवीर-यांच्या गावाजवळ आहे. हिंदुस्थानातील नागही माणसांवर प्रेम करणारे होते. तेथे भाऊ भाऊ नाही का करणार ? प्रभूला माहीत.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel