शेतात भरपूर पिकायला हवे असेल तर शेत नीट नांगरावे लागते. नुसती मेथी पेरायची असेल तर फार खटाटोप नको. परंतु नुसत्या मेथीच्या भाजीने पोट भरत नसते. मेथी-कोथिंबीर हवी. परंतु तांदूळ, गहू, ज्वारी यांनी पुष्टी मिळते. ही धान्ये हवी असतील तर खोल नांगरणी हवी. गहू हवे असतील तर ज्याप्रमाणे नांगर खोल दवडावा लागतो, त्याप्रमाणे समाजाला सुखी करायचे असेल तर खोल लेखणी दवडा. पीक नीट याचे म्हणून कुंदा, हरळी नांगरून काढावी लागते. त्याप्रमाणे समाजाच्या सुखाच्या आड येणा-या सर्व गोष्टींचे उच्चाटन करण्यासाठी लेखणी उचलू, अशी प्रतिज्ञा करा.
समाजातील मूठभर सुखी लोकांचे अलसलुलित संसार रंगवून लेखणीचे ललित कृतार्थ नका मानू. तुमची लेखणी तमाम जनतेची प्रतिनिधी होऊ दे. जनतेची बाजू घेऊन उठू दे. तुमच्या लेखणीच्या कतृत्वाला आज वाव आहे मोठमोठे विचार सभोवती घोंघावत आहेत. आणि समोर दु:खी, कष्टी अपार जनता आहे. भग्न असा विराट संसार आहे. तुमच्या मनोबुध्दी सानुकंप असतील, संवेदनाक्षम, संस्कारक्षम असतील तर वातावरणातील हे अदृश्य वारे तुम्हाला कळतील. तुम्ही का केवळ दृष्याचे उपासक आहात ? दृष्याभोवती विचारांच्या नि भावनांच्या लाटा उसळत असतात. प्रत्येक वस्तूभोवती विचारांचे, भावनांचे वलय असते. ज्याप्रमाणे अणू विभांडून त्यातील अनंत शक्ती शास्त्रज्ञ मुक्त करतात, त्याप्रमाणे या संसाराभोवती जी विचारवादळे घोंघावत असतात, त्यांची शक्ती पकडून ती घरोघर नेऊन पोचविणे आणि तिच्या जोरावर क्रांती घडवून आणणे हे कार्य साहित्यिकांचे आहे. लोकांची मनोरचना बदलणे हे थोर कार्य आहे. खरीखुरी सुधारणा व्हायला हवी असेल तर क्रांती हवी असते. अंतर्बाह्य क्रांती. मानसिक आणि सामाजिक. ती क्रांती घडवून आणून कायमच्या सुखाकडे मानव नेणे हा तुमचा थोर वारसा आहे.
नवसमाज-निर्मिती करायची आहे. दलदली हटवायच्या आहेत, विषारी तण जाळायचे आहे, अज्ञान दूर करायचे आहे, भ्रम हटवायचे आहे, दगड फोडायचे आहेत. तुम्ही या कामासाठी कंबरा बांधा. व्हॉल्टेअरने म्हटले आहे, 'रूढींविरुध्द बंडाचे झेंडे हाती घेऊन जे जे उभे राहतील ते ते सारे मानवजातीचे उपकारकर्तें होत.' म्हणून जनतेचे हृदय हलवून तिच्या बुध्दीला धक्के देऊन क्रांती करायची आहे. महाराष्ट्रात साधुचरित नि बुध्दीप्रधान आगरकरांनी असा तेजस्वी झेंडा उभारला होता. परंतु अजूनही सर्व प्रकारची गुलामगिरी दूर करू पाहणा-या बंडखोरांची अत्यंत आवश्यकता आहे. आजही अजून सर्वत्र बुजबुजाट आहे. अस्पृश्यांना अजूनही दूर ठेवीत आहोत. अजूनही कार्य-क्रमावर जोर देण्याएवजी जातिभेदांवर भर देत आहोत. हे भेदांचे भुंगे आजही समाजजीवन पोखरीत आहेत. आडनावांच्या, जातीच्या नि धर्माच्या पलिकडे अजूनही आमची दृष्टी जात नाही आणि रूढी केवळ धार्मिकच असतात असे नाही. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वाङमयीक सर्व प्रकारच्या रूढी असतात. या सर्व बुरसटलेल्या रूढींवर हल्ले चढवायला तुम्ही उभे रहा. सरंजामशाही नको, जमिनदारी नको, खोती नको, खाजगी नफेबाजी नको, पिळवणूक नको, कोणाची मिरासदारी नको. यासाठी लेखणी हातात घेऊन उभे रहा. तुमचे पराक्रमी ललित येथे दाखवा.