अनेक वर्षे मनात जमलेल्या भावना नि विचार यांच्या राशी मी येथे कागदावर ओतल्या. माझे हृदय रिते करीत असतांना मला अपार आनंद होई. मी भावनांवर नाचत लिहिले. लिहितांना रडे, संतापे, रोमांचित होई. बंकिमचंद्राविषयी असे सांगतात की, ज्यादिवशी ते अत्यंत सुंदर लिहीत, त्यादिवशी ते दुप्पटतिप्पट मागून जेवत. बंकीम हे साहित्यसम्राट आहेत. मी सामान्य आहे. परंतु मलाही अनेकवेळा असा अनुभव आला आहे की, लिहून झाल्यावर गळून गेल्याप्रमाणे होई. अपार भूक लागे. जणू मी माझ्या लिहिण्यात रक्त ओतीत होतो. सारे प्राण ओतीत होतो. मिल्टनने म्हटले आहे की, थोर वाङमय रक्ताने लिहिलेले असते. माझे वाङमय कसेही असो त्यात मी रक्त ओतले आहे. ते रद्दड असले तरी त्यात प्राण आहे, तेथे रक्त आहे, अश्रू आहेत. माझ्या वाङमयाला हात लावाल, तर माझ्या हृदयाला लावाल. माझे वाङमय माझी वाङमयीन मूर्ती आहे.

हे सारे मी का सांगत आहे ? एक गोष्ट आरंभीच मला सांगायची आहे म्हणून. तुम्ही साहित्याची उपासना करू इच्छिणारे. ती उपासना उत्कटपणे करा. एकही ओळ अशी लिहू नका की जी केवळ औपचारिक आहे. जे लिहावे त्यात प्राण ओता. गटे म्हणाला होता, 'अनुभवाशिवाय मी एकही ओळ लिहिली नाही.'  मित्रांनो, जीवन असो की कला असो, सत्याच्या अधिष्ठानानेच त्याला मोल चढत असते. तुम्ही स्वत:शी सत्यरुप रहा. लिहिण्यासाठी म्हणून लिहू नका. तुम्हाला आत भूक असेल, वेदना असेल, तरच लेखणी हाती घ्या. हृदय भरलेले असेल, डोके भरलेले असेल तर लिहायला घ्या. रिकाम्या आडातून काय मिळणार दांभिक पसा-याचा काय उपयोग मनुष्याचे भाग्य आहे की हातांनी तो जे करतो ते आधी त्याच्या हृदयात असते. भारतीय जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आज सत्याची, उत्कटतेची नि प्रामाणिकपणाची नितांत आवश्यकता आहे. अत:पर कसातरी संसार आपणास करायचा नाही. तेजस्वी संसार चालवायचा आहे. खरे तेज सत्यातूनच प्रकट होत असते.

देशबंधू दासांनी सागर-संगीत नावाचे काव्य लिहिले. त्यांची आई आजारी होती. देशबंधू घरी नव्हते. ती माता म्हणाली, 'त्याचे सागर-संगीत आणून द्या. ते मी जवळ घेईन. त्यात माझा चित्तरंजनच आहे.'  तुम्ही जेव्हा साहित्य निर्मू लागाल तेव्हा तुमच्या पुस्तकांविषयी असे म्हणता येऊ दे. ज्यांना असे म्हणता येईल की, माझ्या पुस्तकात मी आहे ते साहित्यिक धन्य होत. त्यांना माझाप्रणाम !

मराठी सारस्वत थोर आहे. त्याचा पायाच मुळी एका ज्ञान-वैराग्यसंपन्न कुमाराने घातला. ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका लिहिली. एकदा पूज्य विनोबाजी भावे म्हणाले,' ज्या भाषेत ज्ञानेश्वरी आहे, ती माझी मातृभाषा आहे हे माझे परमभाग्य होय.' विनोबाजींनी सर्व भारतीय भाषा अभ्यासिल्या आहेत. अरबी, इंग्रजी, फ्रेंच याही त्यांना येतात. परंतु ज्ञानेश्वरीतील अमृतासमान ओव्या आणि तुकोबांचे प्राणमय अभंग यांनी त्यांना जणू भरते येते. अशा ज्ञानेश्वरीच्या पायावर मराठी सारस्वताचे मंदीर उभारलेले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel