देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारत आता लोकशाही मार्गाने समाजवादी ध्येय प्राप्त करून घेईल अशी कोटयावधी भारतीयांना आशा वाटत आहे. हे ध्येय जास्तीत जास्त लौकर प्राप्त होण्यातच देशाचे कल्याण आहे. आंतरराष्ट्रीय शांती राहण्यासही भारताने त्वरेने सामाजवादी ध्येय गाठणे आत्यंतिक जरूरीचे आहे. स्वतंत्र राष्ट्रात अहिंसेचे व्यापक बंधन पत्करून आपापल्या मतांची नि योजनांची सर्वत्र प्रसिध्दी करायला सर्वांनाच वाव हवा. मोकळीक हवी. तरच लोकशाहीचा आत्मा जिवंत राहील.
देशात लोकशाहीचे तत्त्वज्ञान तेव्हाच दृढमूल होईल, जेव्हा आपण आपापल्या मतांचा अति अभिनिवेश बाळगणार नाही. याचा अर्थ आपल्या मतांविषयी आपणासच श्रध्दा नको असा नाही; परंतु सत्य समजणे कठीण आहे. मी माझ्या श्रध्देप्रमाणे जावे, परंतु तोच एक सत्याचा मार्ग असे मी कसे म्हणू ? कदाचित उद्या माझीही चूक मला कळेल आणि मी निराळा मार्ग घेईन. म्हणून मी माझे मन मोकळे करायला हवे. जीवन-प्रकाश घ्यायला सदैव ते तयार असायला पाहिजे. 'बुध्दे : फलमनाग्रह: ' असे वचन आहे. तुमच्याजवळही बुध्दी आहे, विचार करायची शक्ती आहे, हे कशावरून ठरवायचे ? तुम्ही आग्रही नसाल, हट्टी नसाल तर. सत्याचा संपूर्ण ठेवा जणू आपणासच सापडला अशी भावना विचारी मनुष्य कधी करू शकणार नाही. तो आपल्या श्रध्देप्रमाणे जाईल ; परंतु त्या श्रध्देप्रमाणे न जाणा-याचा तो खून करणार नाही. त्यांचा आत्यन्तिक द्वेष तो करणार काही. त्याचे करणे आज तरी मला चुकीचे वाटते असे फार तर तो म्हणेल.
गांधीजीसारख्यांची या देशात हत्या झाली. याचे कारण काय ? आपण सर्वांनी या घटनेचा गंभीर विचार केला पाहिजे. मतांचा अभिनिवेश हाच या गोष्टींच्या मुळाशी नाही का ? मला वाटते तेच सत्य, बाकीचे सारे चूक, एकढेच नव्हे तर राष्ट्राला ते खड्डयात लोटत आहेत, म्हणून त्यांना दूर केले पाहिजे, ही स्वत:च्या मताची आत्यन्तिक आग्रही वृत्तीच या खुनाला प्रवृत्त करती झाली.
कम्युनिस्टांचे आजकालचे तत्त्वज्ञान ' आम्हीच अचूक ' या समजुतीवर उभारलेले आहे. रशियातील स्टॅलिनची कारकीर्द रक्ताने माखलेली आहे. जो जो विरोधी तो तो दूर केला गेला. अपार छळ त्याचे झाले. नाझी लोकच क्रूर होते असे नाही. रशियातील तुरुंगातूनही जे लाखो जीव संशयावरून ठेवले जातात ते ज्यांना शक्य झाले त्यांनी स्वानुभावाने लिहिले आहे. पूर्वी ख्रिस्ती लोकही धर्माचा असाच प्रचार करत. प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्मातही कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट यांनी एकमेकांचा का कमी छळ केला ? मुसलमानी धर्माचा काही प्रचार 'कुराणातच सारे सत्य आहे. ते माना, नाहीतर मान उडवतो.' या अभिनिवेशानेच झालेला आहे.